Friday, April 26, 2024

/

भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; गणेश भाविकांवर हल्ला

 belgaum

बिबट्याच्या दहशती नंतर आता बेळगावकरांना भटक्या कुत्र्यांची समस्या त्रस्त करत आहे. या कुत्र्यांचा उपद्रव आता गणपती बघायला आलेल्या भाविकांना सहन करावा लागत असून भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भाविक जखमी झाल्याची घटना सरदार हायस्कूल परिसरात घडली आहे.

शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस माजवला असून त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मच्छे येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चौघांवर हल्ला केला असून शनिवारी रात्री शहराच्या मध्यवर्ती भागातील सरदार हायस्कूल परिसरात गणपती बघायला गेलेल्या चौघांचा कुत्र्यांनी चावा घेतला आहे. भटक्या कुत्र्यांचा कळप गणपती बघायला आलेल्या तीन महिला व एक पुरुष अशा चौघांच्या अंगावर धावून गेला. मात्र सुदैवाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखून कुत्र्यांना हुसकावून लावले. दरम्यान संबंधित भाविक कुत्र्याच्या चाव्यामुळे जखमी झाले होते.

सरदार हायस्कूल परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांची दहशत अधिकच वाढली आहे. सरदार हायस्कूल परिसरात सुमारे 10 ते 15 कुत्र्यांचा मोठा कळप असून या भागात तो सतत इकडून तिकडे हिंडत असतो. मोकाट हिंडताना लोकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार करणाऱ्या या कुत्र्यांचा उपद्रव अलीकडे वाढला आहे. याबाबत मनपाकडे तक्रार करून देखील याची दखल घेण्यात येत नसून महापालिकेला केव्हा जाग येणार? असा संतप्त सवाल केला जात आहे.

 belgaum

गणेश भक्तांवर रात्रीच्या वेळी झालेला हा हल्ला अत्यंत चिंताजनक आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या सातत्याने वाढत असून महापालिका मात्र कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याकडे साफ दुर्लक्ष करत आहे. बिबट्याला पकडण्यासाठीची वनविभागाची शोध मोहीम आता जशी थंडावली तशी भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठीची मनपाची मोहीम देखील थंडावली आहे का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.Red yellow flag corporation

बेळगावमधील प्रत्येक गल्लीबोळात 7 -8 भटक्या कुत्र्यांचा कळप हैदोस घालताना दिसत आहेत. सध्या गणेशोत्सवाचा काळ असल्यामुळे रात्रीच्या वेळी गणेश भक्त गणेश दर्शनासाठी बाहेर पडतात. अशावेळी ही कुत्री गणेश भक्तांच्या पाठीमागे लागत असून अंगावर धावून जात आहेत. या शिवाय वाहनांच्या मागे धावून जोरजोरात भुंकणे असे प्रकार देखील घडत असून यामुळे या कुत्र्यांची भीती निर्माण झाली आहे. बिबट्याच्या दहशतीबरोबरच आता या भटक्या कुत्र्यांमुळे बेळगावकर अधिकच भयभीत झाले आहेत.

भटक्या कुत्र्यांमुळे जीवितास धोका निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल केला जात आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये कुत्र्याला पकडण्याची मोहीम गतिमान झाली होती. याबरोबरच कुत्र्यांची नसबंदी देखील करण्याकडे मनपाचा कल होता. बारगळलेल्या या मोहिमा पुन्हा कार्यान्वित करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.