ज्यादा प्रवासी संख्येमुळे बेंगळूरहून बेळगावला सकाळच्या सत्रात विमानसेवा सुरू करावी अशा अनेक दिवसांपासूनच्या मागणीला आता यश आले असून इंडिगो एअरलाइन्स कंपनी येत्या 30 ऑक्टोबरपासून बेंगलोर -बेळगाव या मार्गावर सकाळच्या सत्रात अतिरिक्त विमान सेवा सुरू करणार आहे.
कर्नाटकची राजधानी असणाऱ्या बेंगलोर येथून उपराजधानी मानल्या जाणाऱ्या बेळगावला सकाळच्या सत्रात विमानसेवा उपलब्ध नव्हती. परिणामी प्रवासी आणि अधिकाऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना कामानिमित्त वरचेवर बेंगलोरला ये -जा करावी लागते.
याखेरीस बेळगाव येथील अनेक जण बेंगलोर येथे कामानिमित्त जात असतात. या सर्वांसाठी सकाळच्या सत्रातील विमानसेवा गरजेची होती. बेळगाव येथून इंडिगो 6ई -7226 /7239 या विमानाची सेवा यापूर्वीच सुरू झालेली आहे. हे विमान बेंगलोर येथून सायंकाळी 5:35 वाजता प्रस्थान करून बेळगाव येथे सायंकाळी 7:10 वाजता पोहोचते. परतीच्या मार्गावर हे विमान सायंकाळी 7:30 वाजता बेळगाव येथून निघून बेंगलोर विमानतळावर 8:55 वाजता पोहोचते.
दोन दिवसांपूर्वी खासदार मंगला अंगडी यांनी बेळगाव विमानतळाच्या ठिकाणी सुरू होणाऱ्या वैमानिक प्रशिक्षण केंद्रांच्या उभारणीच्या कामाची पाहणी केली होती. सदर पाहणी दौऱ्याप्रसंगी खासदार अंगडी यांनी उपस्थित विविध एअरलाइन्स कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बेळगाव -बेंगलोर सकाळच्या विमानसेवेसंदर्भात चर्चा केली होती. त्यावेळी इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी सदर अतिरिक्त विमान सेवा लवकरच सुरू केली जाईल असे आश्वासन दिले होते.
त्यानुसार इंडिगो एअरलाइन्सने येत्या 30 ऑक्टोबरपासून सकाळच्या सत्रात विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून गेल्या शुक्रवारपासून तिकीट बुकिंगही सुरू केले आहे. इंडिगोचे विमान 6ई -7285 /7286 बेंगळूर येथून सकाळी 9:20 वाजता प्रस्थान करून सकाळी 10:55 वा. बेळगावला पोहोचणार आहे त्याचप्रमाणे बेळगाव येथून सकाळी 11:15 वा. निघणारे हे विमान दुपारी 12:40 वा. बेंगलोर येथे पोहोचणार आहे. सध्या बेळगाव विमानतळावरून दिल्ली, बेंगलोर, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, पुणे, सुरत, इंदोर, नागपूर, नाशिक आणि तिरुपती या शहरांसाठी विमान सेवा सुरू आहे.