बारमध्ये यथेच्छ दारू ढोसून मौजमजा केल्यानंतर बार मालकाला लहान मुलांच्या खेळातील बनावट पाचशेच्या नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाला घटप्रभा पोलिसांनी आज गजाआड केले असून त्यांच्याकडून 500 रुपयांच्या एकूण 473 नकली नोटा जप्त केल्या आहेत.
बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री घटप्रभा पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील एका बारमध्ये तिघेजण दारू पिण्यासाठी आले.
येथेच दारू पिऊन मौजमजा केल्यानंतर बिलाच्या स्वरूपात त्या त्रिकूटाने बार मालकाला लहान मुलांच्या खेळातील 500 रुपयांच्या बनावट नोटा देऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बारमालकाने घटप्रभा पोलिस ठाण्यात त्या तिघांविरुद्ध तक्रार नोंदवली.
त्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करत पोलिसांनी आज बुधवारी संबंधित तिघाही जणांना अटक केली. तसेच त्यांच्याकडील लहान मुलांच्या खेळातील पाचशे रुपयांच्या एकूण 473 नकली नोटा जप्त केल्या. याप्रकरणी घटप्रभा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.