Saturday, May 4, 2024

/

रिव्हर साईड स्कूलनेच पटकाविला ‘रिव्हर साईड चषक’

 belgaum

चिंचली (ता. रायबाग) येथील महाकाली शिक्षण संस्था, फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सिल आणि रिव्हर साईड स्कूल आयोजित ‘रिव्हर साईड चषक -2022’ या 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद यजमान रिव्हर साईड स्कूल संघाने पटकाविले.

चिंचली (ता. रायबाग) येथील रिव्हर साईड शाळेच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रिव्हर साईड संघाने प्रतिस्पर्धी फिनिक्स होनगा संघाला 4 -1 अशा गोल फरकाने पराभूत करून रिव्हर साईड चषक हस्तगत केला. सदर स्पर्धेचे उद्घाटन महाकाली शिक्षण संस्थेचे चेअरमन माजी एमएलसी विवेकराव पाटील यांच्या हस्ते झाले. सदर स्पर्धेचा अंतिम सामना रिव्हर साईड स्कूल चिंचली संघ आणि फिनिक्स स्कूल होनगा संघ यांच्यात झाला. या सामन्यात रिव्हर साईड संघाने फिनिक्स संघावर शानदार विजय मिळवला. रिव्हर साईड संघातर्फे प्रज्वल हडंगे, रोहित कुरनाळे आणि गजानन अनुसे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत गोल नोंदवण्याद्वारे आपल्या संघाला विजय मिळवून दिला. पराभूत फिनिक्स होनगा संघातर्फे पलाश मेळगीमनी याने एकमेव गोल नोंदविला.

स्पर्धेच्या तिसऱ्या क्रमांकासाठी खेळण्यात आलेल्या सामन्यात कणक मेमोरियल स्कूल नेहरूनगर संघाने प्रतिस्पर्धी अमोघ स्कूल रायबाग संघावर 1 -0 अशा गोल फरकाने निसटता विजय मिळवला. कनक मेमोरियलतर्फे महांतेश हिरेकुरबर याने सामन्यातील निर्णायक गोल केला. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक शिक्षण खात्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी डी. एस. डिग्रेज, माजी एमएलसी विवेकराव पाटील, लक्ष्मीकांत देसाई, केएमएफचे अधिकारी जयानंद, राजू कोरे, महादेव दरमट्टी, जे. टी. पाटील, आनंद शिंदे, संजू सौदलगी, सुनील चौधरी, कलमेश्वर, विद्या वग्गणावर, विश्वनाथ पाटील, राजू बनगे, नवीन पट्टीकेरी आदी उपस्थित होते.Football

 belgaum

व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे अंतिम सामन्यातील प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

स्पर्धेतील उत्कृष्ट गोल रक्षक म्हणून श्रीराम (अमोघ), उत्कृष्ट बचावटू म्हणून अमित गट्टे (हारूगेरी), उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रज्वल हांडगे (चिंचली), उगवता खेळाडू म्हणून आदित्य केंचन्नावर (होनगा) आणि शिस्तबद्ध संघ म्हणून वसंतराव पाटील स्कूल (जलालपूर) यांची निवड करण्यात आली. स्पर्धेसाठी पंच म्हणून नईम अरळीकट्टी, डी. वाय. नंदीहाळ, दिग्विजय शिंदे, राहुल हारुगे आणि एम. आर. खडकगोळ यांनी काम पाहिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.