संयुक्त महाराष्ट्र सीमा समितीने 1 जून 1986 साली छेडलेल्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या 9 हुतात्म्यांना आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी मराठी भाषिकांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून अमर रहे अमर रहे हुतात्मे अमर रहे! अशी घोषणा देत हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आज बुधवारी 1 जून रोजी सकाळी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मध्यवर्ती म. ए. समिती, बेळगाव शहर म. ए. समिती, खानापूर तालुका म. ए. समिती आणि निपाणी महाराष्ट्र म. ए. यांच्यासह विविध संघसंस्थांच्यावतीने हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील
माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, किरण सायनाक, शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दूदवाडकर, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, बेळगाव तालुका युवा आघाडीचे संतोष मंडलिक, रमाकांत कोंडुसकर, माजी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, महेश जुवेकर, गणेश दड्डीकर, माजी नगरसेवक रणजित चव्हाण -पाटील, ॲड. सुधीर चव्हाण आदींनी हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून नमन केले.
याप्रसंगी बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर यांनी 1986 चे कन्नड सक्ती आंदोलन कशासाठी झाले त्यामध्ये बलिदान देणारे 9 हुतात्मे यांची माहिती देऊन तेंव्हापासून सुरु असलेले कन्नड सक्ती विरोधी आंदोलन आज 36 वर्षे पूर्ण झाली तरी सुरूच असल्याचे सांगितले. सरकारी कागदपत्रे परिपत्रके मराठी भाषेत दिली जावी असा उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही कर्नाटक सरकारला आदेश पायदळी तुडवून कन्नड सक्ती करत आहे. उलट आता ही सक्ती जास्तच सुरू असून प्रत्येक ठिकाणी कन्नडचा वरवंटा फिरवला जात आहे हे दुर्दैवी आहे. आपला देश पारतंत्र्यात असताना ब्रिटिशांनी देखील कधी इंग्रजीची सक्ती केली नव्हती. त्यावेळीही लोकांना त्यांच्या मातृभाषेत सरकारी कागदपत्रे मिळत होती. मात्र कर्नाटक सरकारने डिजिटलायझेशनच्या नावाखाली 1995 पासून सर्वत्र कानडीकरण सुरू केले आहे.
या कन्नड सक्तीच्या विरोधात म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली लढा दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी हुतात्म्यांच्या रक्ताची शपथ घेऊन सर्वांनी संघटित लढा दिला पाहिजे असे सांगून हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी म. ए. समितीने जी 11 गुंठे जागा घेतली आहे. त्या जागेत दुमजली हुतात्मा स्मारक भवन उभारण्यात येणार आहे. मात्र यासाठी 80 ते 85 लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती किणेकर यांनी दिली. कन्नड सक्ती हटविण्याचे हुतात्म्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी समितीच्या लढ्यात सामील होणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.
माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी कन्नड सक्ती संदर्भात बोलताना सीमाप्रश्न आणि कन्नड सक्तीसंदर्भात खेड्यापाड्यांसह शहरांमध्येही सातत्याने बैठका सभा झाल्या पाहिजेत. शहरातील पिढीला सीमा प्रश्न कळाला पाहिजे, मराठी माणसावर किती अन्याय होतो याची जाणीव त्यांना झाली पाहिजे. यासाठी शहरात छोट्या छोट्या सभा झाल्या पाहिजेत. युवा पिढीने सीमा लढ्यात सहभागी होणे ही काळाची गरज आहे असे सांगून आज जो जनसमुदाय जमला आहे त्या पेक्षा तिप्पट जनसमुदाय जमेल याकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे असे सरस्वती पाटील यांनी सांगितले.
माजी महापौर सरिता पाटील यांनी आपल्या भाषणात बेळगावसह सीमा भागात गेली 36 वर्ष कन्नड सक्तीचा बडगा उगारला जात आहे. त्या काळी 1986साली गोळीबार झाला आताही तो थांबलेला नाही. आताचा जो गोळीबार आहे तो वेगळ्या स्वरूपातील आहे. आता समिती नेते आणि युवा कार्यकर्त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा स्वरूपात गोळीबार केला जात आहे. हे सर्व जाचक असून आम्ही ते सहन करणार नाही. मातृभाषेचा अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे. शाळांमध्ये मराठी, हिंदी विषय निवडण्याचे स्वातंत्र्य दिले गेले पाहिजे असे सांगून सीमा प्रश्नाची सोडवणूक हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे सरिता पाटील म्हणाल्या. माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी हुतात्म्यांना अभिवादनाचा हा कार्यक्रम शेवटचा ठरावा पुढील अभिवादनाच्या कार्यक्रमापूर्वी सीमाप्रश्न सुटलेला असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच न्यायालयीन लढा बरोबरच रस्त्यावरील लढाई महत्त्वाची असल्याचे सांगून जोपर्यंत सीमा प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत मराठी भाषिक मागे हटणार नाही हे सरकारने लक्षात ठेवावे असे किल्लेकर म्हणाल्या.
शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुदवाडकर यांनी सीमा लढ्यात युवा पिढीचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. येणाऱ्या तरुण पिढीला समितीचे कार्य कळाले पाहिजे. आपण जे मागतो आहोत ते आमच्या हक्काचे आहे हे तरुण पिढीला कळाले पाहिजे, त्यांनी आपल्यासोबत आले पाहिजे असे सांगून शिवसेना कायम मराठी भाषिकांच्या पाठीशी आहे असे दुदवाडकर म्हणाले. त्याचप्रमाणे हुतात्मा स्मारक सुशोभीकरणाचा संपूर्ण खर्च शिवसेनेतर्फे दिला जाईल असे त्यांनी जाहीर केले. मात्र त्यावेळी हस्तक्षेप करताना मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी आर्थिक मदत करण्याऐवजी शिवसेनेने मुंबईत लढा उभारावा. सीमा लढ्यात शिवसेनेने समितीबरोबर अग्रभागी रहावे अशी विनंती केली. यावेळी दीपक दळवी, संतोष मंडलिक यांच्यासह समितीच्या अन्य नेते मंडळींनी देखील समयोचित विचार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमादरम्यान अनेकांनी हुतात्मा स्मारक भवन उभारण्यासाठी भरीव देणग्या दिल्या.