बेळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन आणि चिकोडी कायदा सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तायक्वांडो कौशल्य विकास चर्चासत्र व कायदा साक्षरता कार्यक्रम चिकोडी येथे रविवारी उत्साहात पार पडला.
सदर कार्यक्रमात जिल्हा तायक्वांडो संघाच्यावतीने तायक्वांडो तंत्राद्वारे शारीरिक कार्यक्षमता वाढवणे, शारीरिक लवचिकता वाढवणे, जागतिक तायक्वांडो स्पर्धेचे नियम, अँटी डोपिंगबद्दल परिचय, क्योरुगी आणि पूमसेचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आवश्यक तंत्र व स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आला.
तसेच चिकोडी कायदा सेवा समितीच्यावतीने कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना दैनंदिन जीवनात अत्यावश्यक असलेल्या कायद्यांची माहिती देऊन या कायद्यांबाबत साक्षरता करण्यात आला. सदर कार्यक्रमांतर्गत ‘ब्लॅक बेल्ट डॅन’ पदोन्नती चांचणी देखील घेण्यात आली. यामध्ये जितेश सतीश पुजारी, त्रिवेणी भावकण्णा भडकण्णावर, श्रेया मारुती अतिवाडकर, अक्षय संजीव मालगे, विहान संकेत मांजरेकर, अरविंद सनदी, संदीप सदाशिव धामन्नावर, वज्रकुमार महावीर सुदगडे, विरकुमार महावीर सुडगडे, विजय सुधीर बेडगे, अनंत कृष्णा बाबळेश्वर आणि निशांत अरविंद गायकवाड हे सर्वजण प्राथमिक स्तरावरील प्रॅक्टिकल परीक्षेत उत्तीर्ण झाले.
समारोप समारंभाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे 7 वे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एल. चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात प्रत्येकाला भारतीय संविधान अनुच्छेद 21 मध्ये आपल्या जीवाच रक्षण आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला आहे. तसेच भा.द.वि. कलम 96 ते 106 मध्ये प्रत्येक व्यक्तीला शरीर आणि मालमत्तेच्या खाजगी संरक्षणाचा अधिकार देखील दिला असून तायक्वांडोचा आत्मसंरक्षणाची कला आणि क्रीडा दृष्टिकोनातून वापर केला जावा, असे आवाहन केले.
सहाय्यक आयुक्त व चिकोडी उपविभाग दंडाधिकारी संतोष कामागौडा यांनी तायक्वांडो क्रीडापटूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी होऊन सरकारी सुविधा आणि संधीच लाभ घ्यावा, असा संदेश दिला. कायदा सेवा समितीचे सचिव मा. प्रधान दिवाणी न्यायाधीश चिदानंद बडिगेर यांनी सर्वांनी हा क्रीडा शिकणे अत्यावश्यक असून या स्वसंरक्षणाच्या कलेमुळे मानसिक व शारीरिक सुदृढता वाढते. यासाठी कायद्याच्या मर्यादेत राहून ही स्वसंरक्षणाची कला वापरावी, असे क्रीडापटूंना समजावले.
यावेळी चिकोडी तालुका शैक्षणिक संस्थेचे सदस्य संकेत मांजरेकर यांनी चर्चासत्र कार्यक्रमासह चांचणीत सहभागी लहान मुलांचा परिश्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून चिकोडी कायदा सेवा समितीचे अध्यक्ष मा. प्रधान ज्येष्ठ दिवाणी न्यायाधीश श्रीकांत टी, बार असोसिएशनचे अध्यक्ष नागेश कीवाढ, चिकोडी तालुका शैक्षणिक संस्थेचे संचालक सतीश कुलकर्णी, बेळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर शेडबाळे आदींसह पालक वर्ग आणि क्रीडाप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.
ब्लॅक बेल्ट डॅन पदोन्नती चांचणीसाठी डब्ल्यूटी आंतरराष्ट्रीय तायक्वांडो पंच, मुख्य प्रशिक्षक व जिल्हा तायक्वांडो संस्थेचे सचिव महादेव मुतनाळे आणि भारतीय वायुसेनेचे आंतरराष्ट्रीय तायक्वांदो मुख्य परीक्षक प्रशिक्षक श्रीपाद रवी राव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सदर कार्यक्रमांमध्ये बेळगाव, सांबरा, मुतगा, काकती, संकेश्वर, गोकाक, बैल्होंगल, चिकोडी आणि निपाणी येथून 140 तायक्वांडोपटुंनी भाग घेतला होता. चर्चासत्र कार्यक्रम आणि चांचणी यशस्वी करण्यासाठी सहाय्यक तायक्वांडो प्रशिक्षक स्वप्नील राजाराम पाटील व वैभव राजेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.