सातत्याने रेल्वेचा प्रवास करावा लागणाऱ्या आणि आयआरसीटीसीच्या माध्यमातून ऑनलाईन तिकीट आरक्षण करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे भारतीय रेल्वेची सहाय्यक इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीसीने आपल्या तिकीट आरक्षणाच्या मानकांमध्ये बदल केला आहे. या नव्या नियमाच्या अंमलबजावणीमुळे कोट्यावधी प्रवाशांना आपले सध्याचे खाते अर्थात अकाउंट तपासून कन्फर्म करावे लागणार आहे.
संबंधित प्रवाशांसाठी मोबाईल नंबर आणि ई-मेल याची पडताळणी करून घेणे अनिवार्य असणार आहे. आयआरसीटीसीच्या नव्या मानकांनुसार भारतीय रेल्वेच्या ग्राहकांनी तिकीट आरक्षण करण्यापूर्वी प्राधान्याने त्यांचे मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी तपासून घ्यावेत.
कोरोनाचा देशात शिरकाव झाला तेंव्हापासून म्हणजे मार्च 2020 पासून ज्यांनी आयआरसीटीसी एप्लीकेशन अथवा साईटद्वारे तिकीट आरक्षण केले नाही त्यांच्यासाठी हा बदल लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. प्रवाशांनी आपले मोबाईल नंबर आणि ई-मेल तपासणी पुढीलप्रमाणे करावी.
प्रथम आयआरसीटीसी एप्लीकेशन किंवा साईटवर जा आणि व्हेरीफिकेशन विंडोवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला आपला सूचिबद्ध मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी नोंद करावी लागेल.
ही नोंदणी झाल्यानंतर चेक बटन क्लिक करावे. त्यानंतर व्हेरिफाय टाईप केल्यानंतर तुमचा ओटीपी नंबर मोबाईलवर येईल तो ऐंटर करून मोबाईल नंबर कन्फर्म करा. याच पद्धतीने ई-मेल आयडीवर आलेला कोड ऐंटर केल्यानंतर ईमेल आयडी कन्फर्म होईल.