एमएसएमई न्यायालयाच्या आदेशानुसार बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडला मंडोळी रस्ता बांधकामाचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराला तब्बल 10 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
गेल्या जानेवारी 2016 मध्ये बेळगावची निवड देशातील पहिल्या 20 स्मार्ट सिटीमध्ये झाली. त्यानंतर कामाच्या निविदा 2017 मध्ये काढण्यात आल्या आणि डिसेंबर 2017 मध्ये स्मार्ट सिटीच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली. ही कामे पूर्ण करण्यासाठी 12 महिन्यांची मुदत देण्यात आली. भूसंपादनाची नुकसानभरपाई देण्याची समस्या असल्यामुळे प्राईम सिव्हील इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नरेंद्र चुनीलाल पनानी या कंत्राटदारांना निर्धारित वेळेत मंडोळी रस्त्याचे काम पूर्ण करता आले नाही.
परिणामी कंत्राटदार पनानी यांनी एमएसएमई न्यायालयात धाव घेतली. यासंदर्भात न्यायालयाने बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड ला कंत्राटदारास नुकसान भरपाई आदेश बजावला आहे. कंत्राटदाराकडे संबंधित जमीन वेळेवर हस्तांतरित करण्यात आली नसल्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. यासाठी सदर कंत्राटदाराला 10 कोटी रुपये नुकसानभरपाई दिली जावी, असे आदेशात नमूद आहे.
मंडळी रोड हा रस्ता 18 मी. रुंद होता. बुडाने तो सीडीपीनुसार 24 मी. रुंद केला. रस्ता रुंदीकरणात इमारती पाडण्यात येणार असल्यामुळे इमारत मालकांनी न्यायालयात धाव घेऊन नुकसान भरपाईची मागणी केली आणि कामाला स्थगिती आदेश मिळविला. मंडोळी रोड रस्त्याचे विकास काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे. या रस्त्यावर पथदिव्यांची सोय नाही. जनतेची गैरसोय होऊन त्रास होत असल्यामुळे कसेबसे स्थानिक कंत्राटदाराकडून हा रस्ता कसाबसा तयार करून घेण्यात आला आहे.
मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे बेळगाव स्मार्ट सिटी वेबसाईटनुसार मंडोळी रोड रस्त्याचे सर्व काम व्यवस्थित पूर्ण झाले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत भाग्य उजळलेले मंडोळी रोड आणि केपीटीसीएल रोड हे बेळगावातील पहिले दोन रस्ते आहेत. प्रत्यक्षात एकंदर परिस्थिती पाहता सर्वाधिक दीर्घकाळ विकास काम सुरू असलेला रस्ता म्हणून मंडोळी रोडचे नांव बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.