बेळगावच्या आशा नाडकर्णी यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या हब्बनहट्टी या गावातील दुर्लक्षित अंगणवाडी शाळेला खुर्च्या, टेबल आणि खेळाच्या साहित्याची देणगी दिली.
हब्बनहट्टी हे गाव खानापूर तालुक्यातील घनदाट जंगलात वसले आहे. बेळगाव शहरापासून सुमारे 20 कि. मी. अंतरावर असलेले हे गाव बऱ्याच मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित आहे. येथील लहान मुलांची अंगणवाडी देखील दुर्लक्षित असल्याचे ध्यानात घेऊन फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी या अंगणवाडीला मदत करण्याचे ठरविले.
त्यांना साथ देताना दरेकर यांचे मित्र आशुतोष नाडकर्णी यांच्या आई आशा नाडकर्णी यांनी हब्बनहट्टी अंगणवाडीला 25 प्लास्टिक खुर्च्या, 40 लाकडी खुर्च्या, तीन टेबल, एक घसरगुंडी आणि राऊंड व्हील देणगी दाखल दिले. हे साहित्य रंगविण्यासाठी सुनील धोंगडी यांनी ऑइल पेंटची व्यवस्था केली.
हे साहित्य हब्बनहट्टी अंगणवाडीकडे सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी उपस्थित होते. यांच्या हस्ते साहित्याचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर, हब्बनहट्टी ग्रामस्थ नागोजी गावडे, गोविंद गावडे, अर्जुन गावडे, संजय गावडे, नानू घाडी, मारुती गावडे, पांडुरंग गावडे, परशुराम गावडे, धनाजी गावडे आदी उपस्थित होते. देणगीदारांच्या मदतीने हब्बनहट्टी अंगणवाडी शाळेच्या नूतनीकरणाचा आपला विचार यावेळी संतोष दरेकर यांनी बोलून दाखविला.