शहरात घरफोडी : 13 लाखाचा ऐवज लंपास –हनुमाननगर येथे एका बंद घराचा पाठीमागील दरवाजा फोडून सुमारे 13 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
हनुमाननगर येथील डॉ विनायक कबटे यांच्या घरात गेल्या रविवारी भर दुपारी सकाळी 11:30 ते दुपारी 2:30 या वेळेत सदर घरफोडीचा प्रकार घडला आहे. डॉ विनायक हे परगावी गेल्याची संधी साधून त्यांच्या बंद घराच्या पाठीमागील दरवाजा फोडून चोरट्यांनी तिजोरीतील 250 ग्रॅम सोने आणि 1 लाख रुपये रोख रक्कम असा सुमारे 13 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा ऐवज पळविला. दोघा अज्ञातांनी हे कृत्य केले आहे.
डॉ. विनायक कबटे यांचे घर मालक पहिल्या मजल्यावर राहतात रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मास्क व हॅन्ड ग्लोज घातलेल्या एका तरुणाला घरमालकाने पाहिले. त्यांना पाहताच 2 पिशवीत भरून ठेवलेले चांदीचे दागिने तसेच सोडून चोरट्यांनी पळ काढला. मात्र पाव किलो सोन्याचे दागिने पळवण्यात चोरटे यशस्वी झाले. एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी विनायक यांनी हे दागिने घरी आणले होते. तिथून जवळच त्यांचे स्वतःचे घर आहे. घराच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे म्हणून ते भाड्याच्या घरात राहतात. या चोरी प्रकरणी रविवारी रात्री उशिरा एपीएमसी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
होनग्यात दरोडेखोरांनी लांबविले 1.30 लाख रुपये
होनगा (ता. जि. बेळगाव) येथे पिस्तूल आणि वेळ याचा धाक दाखवून एका घरावर दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरांनी जीवे मारण्याची धमकी देऊन घरातील 1 लाख 30 हजार रुपये लुटल्याची घटना काल सोमवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली.
होनगा येथील कारखानदार प्रवीण भीमाचा निरंजन यांच्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग शेजारी असलेल्या घरात हा दरोड्याचा प्रकार घडला. प्रवीण हे काल रात्री टीव्हीवर क्रिकेट सामने पाहत होते. त्या वेळी त्यांच्या घरात मास्क मंकीकॅप व हॅन्ड क्लोज घातलेले तीन दरोडेखोर शिरले. घरात शिरताच त्यांनी प्रवीण यांच्या कपाळावर पिस्तुल रोखले. हा प्रकार पाहून त्यांच्या पत्नीने आरडाओरड केली. लगेच तिच्या गळ्यावर विळा ठेवण्यात आला आणि पैशाची विचारणा करण्यात आली. आम्हाला सहकार्य केलात तर तुमचा जीव वाचेल असे दरोडेखोरांनी सांगितले.
स्वतःसह पत्नीच्या जीवावर बेतल्यामुळे प्रवीण यांनी दरोडेखोरांना तिजोरीकडे नेले. तिजोरी उघडताच 1 लाख 30 हजार रुपये दरोडेखोरांच्या हाती लागले. ती रक्कम ताब्यात घेताच पिस्तुलाच्या मुठीने प्रवीण यांच्या डोक्यावर हल्ला करून दरोडेखोर पसार झाले. त्यानंतर प्रवीण निरंजन यांनी लागलीच काकती पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी काल रात्री उशिरा काकती पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून दरोडेखोरांचा शोध जारी आहे. दरोडेखोर हे 20 ते 30 वयोगटातील असल्याचे सांगण्यात आले. संशयित एकमेकांशी हिंदीमध्ये बोलत होते. त्यामुळे दरोडेखोर स्थानिक नसावेत असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला आहे.