क्रिप्टो करेंसीमध्ये गुंतवणूक करून 60 टक्के नफा कमवा असे आमिष दाखविणारा इंस्टाग्राम प्रोफाईल टाकून जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी बेंगलोर शहर पोलिसांनी रायबाग येथील दोघा युवकांना काल सोमवारी अटक केली.
किरण भरतेश (वय 21) आणि अर्षद मोयुद्दिन (वय 20) अशी अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे असून हे दोघेही पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांचे विद्यार्थी आहेत.
या दोघांनी लोकांची फसवणूक करण्यासाठी सोशल मीडियावर अनेक प्रोफाइल्स उघडले होते. त्याद्वारे अवघ्या 20 मिनिटात क्रिप्टो करेंसीतील गुंतवणुकीवर 60 टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष ते लोकांना दाखवत होते.
त्यांच्या जाळ्यात अडकून 26 हजार रुपयांची फसवणूक झालेल्या एका व्यक्तीने बेंगलोर ईशान्य विभाग सीईएन पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन बेंगलोर सीईएन पोलिसांनी किरण आणि हर्षद यांना अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.