Saturday, July 27, 2024

/

मराठा स्पोर्ट्स, एसआरएस, विघ्नहर्ता यांची प्रतिस्पर्ध्यांवर मात

 belgaum

श्री स्पोर्ट्स, खडक गल्ली यांच्यातर्फे आयोजित ‘श्री चषक -2022’ निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेतील बुधवारी झालेल्या सामन्यांमध्ये मराठा स्पोर्ट्स बेळगाव, एसआरएस हिंदुस्तान आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स अनगोळ या संघांनी विजय नोंदविले.

टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात येत असलेल्या या स्पर्धेच्या आज बुधवारी सकाळी झालेल्या पहिल्या सामन्यात मराठा स्पोर्ट्स बेळगाव संघाने प्रतिस्पर्धी यूपी इलेव्हन स्टार संघावर 42 धावांनी विजय संपादन केला. प्रथम फलंदाजी करताना मराठा स्पोर्ट्स बेळगाव संघाने मर्यादित 8 षटकात दोन गडी बाद 102 धावा झळकाविलेल्या.

प्रत्युत्तरादाखल यूपी इलेव्हन स्टार संघाला मर्यादित 8 षटकात 9 गडी गमावून 59 धावा काढता आल्या. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्कार मराठा स्पोर्ट्सच्या प्रसाद नाकाडी याने पटकाविला. त्याला प्रमुख पाहुणे प्रशांत नाईक, प्रकाश नंदगडकर व निलेश चंदगडकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.Cricket

दुसऱ्या सामन्यात एसआरएस हिंदुस्तान संघाने प्रतिस्पर्धी इंदिरा पॉईंट संघाला 9 गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना इंदिरा पॉइंट संघाने मर्यादित 8 षटकात 6 गडी गमावून 32 धावा काढल्या. एसआरएस हिंदुस्थानने अवघ्या 2.3 षटकात 1 गडी गमावून 35 धावा झळकविल्या. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्कारासाठी आरएसएसच्या विकी पुजारी यांची निवड करण्यात आली. त्याला प्रमुख पाहुणे निलेश चंदगडकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

आजच्या तिसऱ्या सामन्यात विघ्नहर्ता स्पोर्ट्स अनगोळ संघाने प्रतिस्पर्धी कलमेश्वर स्पोर्ट्स बाळेकुंद्री (खुर्द) संघावर 8 गडी राखून विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना कलमेश्वर स्पोर्ट्स संघाला 7.4 षटकांत सर्व गडी गमावून 38 धावा काढता आल्या. हे आव्हान यशस्वीरित्या झेलताना विघ्नहर्ता स्पोर्ट्स संघाने 2.5 षटकात 3 गडी गमावून 41 धावा काढल्या. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्कार विघ्नेश्वर स्पोर्ट्सच्या दर्शन बांदेकर याने हस्तगत केला. त्याला प्रमुख पाहुणे तृषल किल्लेदार व उमेश कर्लेकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.Shree trophy cricket

चौथ्या सामन्यात एसआरएस हिंदुस्तान संघाने प्रतिस्पर्धी एसआर वारियर्स संघावर 83 धावांनी दणदणीत विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना एसआरएस हिंदुस्तान संघाने मर्यादित 8 षटकात 2 गडी गमावून 123 धावांचा डोंगर उभारला. हे आव्हान एसआर वॉरियर्स संघाला पेलता आले नाही आणि त्यांना मर्यादित 8 षटकात 5 गडी बाद 40 धावाच काढता आल्या. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी एसआरएस हिंदुस्तान संघाचा संदीप मकवान हा ठरला. त्याला प्रमुख पाहुणे महेश फगरे, दौलत शिंदे व वल्लभ कदम यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

आजच्या पहिल्या सामन्यातील विजेत्या मराठा स्पोर्ट्स बेळगाव आणि तिसऱ्या सामन्यातील विजेत्या विघ्नहर्ता स्पोर्ट्स अनगोळ या संघांमध्ये आजचा शेवटचा पाचवा सामना खेळविण्यात आला. या सामन्यात विघ्नहर्ता स्पोर्ट्स अनगोळ संघाने 8 गडी राखून विजय नोंदविला. प्रथम फलंदाजी करताना मराठा स्पोर्ट्स संघाने मर्यादित 8 षटकात 5 गडी बाद 49 धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल विघ्नहर्ता स्पोर्ट्स संघाने 5 षटकात 2 गडी बाद 52 धावा झळकाविल्या. ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी विघ्नहर्ता संघाचा अरविंद नेमुळकर हा ठरला. त्याला प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण तोपिनकट्टी, चेतन महाराज आणि मोईन खान यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.