Tuesday, April 23, 2024

/

‘त्या’ टीकेमुळे महापौर -उपमहापौर निवडणूक पाठपुरावा सुरू

 belgaum

केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांच्या टीकेनंतर बेळगावच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकी संदर्भातचा पाठपुरावा प्रशासनाने सुरु केला असून ही निवडणूक का प्रलंबित राहिली? याची माहिती जिल्हाधिकारी तथा महापालिका प्रशासक एम. जी. हिरेमठ यांनी बुधवारी कौन्सिल विभागाकडून घेतली आहे.

बेळगाव महापालिकेत निवडून आलेले नगरसेवक आणि नगरसेविका केवळ चहापानासाठी मर्यादित आहेत. महापालिकेत बेळगाव दक्षिणचे आमदार ‘महापौर’ आणि उत्तरचे आमदार ‘उपमहापौर’ असल्याची बोचरी टीका आमदार सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली होती.

त्याचप्रमाणे राज्य सरकारने ही अनधिकृत नेमणूक केली असून त्या दोघांनाही काँग्रेसच्यावतीने दोन्ही पदाची दोन वस्त्रे (गाऊन) आम्हीच देऊ असा टोला देखील जारकीहोळी यांनी लगावला होता. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी तथा महापालिका प्रशासक एम. जी. हिरेमठ यांनी काल बुधवारी महापौर व उपमहापौर निवडणूक प्रक्रिया का थांबली आहे? याबाबतची माहिती कौन्सील विभागाकडून घेतली.

 belgaum

दरम्यान महापौर उपमहापौर निवडणुकीवरून जारकीहोळी यांनी पुन्हा बेळगाव दक्षिणचे आमदार यांना लक्ष्य केले आहे. होर्डींग्स ठेक्याची चौकशी सुरू करून दक्षिणच्या आमदारांनी जारकीहोळी यांना शह देण्याचा प्रयत्न केला होता. आता जारकीहोळी यांनी थेट त्यांचे नांव घेऊन टीका केली आहे. या वादात त्यांनी बेळगाव उत्तरच्या आमदारांनाही ओढल्याने नव्या राजकीय संघर्षाची ठिणगी पडल्याची चर्चा आहे.

माजी आमदार रमेश कुडची यांना पुन्हा सक्रिय करण्यात जारकीहोळींचा पुढाकार कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे ते आता बेळगाव उत्तरमधील राजकारणातही सक्रिय झाल्याचे दिसत आहे.

आमदार सतीश जारकीहोळी यांनी काही दिवसांपासून बेळगाव दक्षिण मतदारसंघात विणकर व अन्य संघटनांच्या माध्यमातून विधानसभेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांना दक्षिणमध्ये मताधिक्य मिळाले नसले तरी गत निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळाली. त्यामुळे बेळगाव दक्षिणमध्ये कॉंग्रेस मजबूत करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या माध्यमातून विद्यमान आमदारांना शह देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गेल्या 2018 मध्ये 100 कोटी निधी विनियोगासाठी जारकीहोळी यांनी नगरसेवक व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीला दक्षिणच्या आमदारांनी आक्षेप घेतला होता.

सर्वसाधारण सभेत त्यांनी तो विषय उपस्थित केला होता. तेंव्हापासून दोन्ही आमदारांमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. आता भाजपच्या दोन्ही आमदारांकडूनच महापालिकेचे कामकाज चालविले जाते असल्याची थेट टीका करून आमदार सतीश जारकीहोळी यांनी दक्षिणच्या आमदारांना डिवचले असल्यामुळे ते त्याला कसे प्रत्युत्तर देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.