belgaum

मुतगा कृषी पत्तीनं मध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे मोडकळीस आलेल्या मुतगे कृषी पत्तीन सहकारी संघाने कृषी कर्ज देण्यास टाळाटाळ चालविल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी काल मंगळवारी संघाच्या कार्यालयास टाळे ठोकून आमरण उपोषण सुरू केले आहे.

bg

गेल्या काही वर्षात संचालक मंडळ व सेक्रेटरी अमोल पाटील यांनी संघाच्या दैनंदिन व्यवहारात आणि इमारत बांधकामामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे वार्षिक ताळेबंद पत्रक मंजूर झालेले नाही. परिणामी बेळगाव डीसीसी बँकेने गेल्या 4 -5 वर्षापासून कृषी कर्ज देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारच्यावतीने देण्यात येणारे कर्ज आणि इतर सुविधा मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून अनेक बैठका झाल्या. परंतु बेजबाबदार संचालक आणि भ्रष्ट कारभारामुळे संस्था मोडकळीस आणणारा सेक्रेटरी कृषी कर्ज वाटप करण्यात अपयशी ठरले आहेत. हे सर्वजण एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आजपर्यंत वेळ मारून नेत आले आहेत, असे शेतकऱ्यांचे स्पष्ट मत आहे.

यासाठीच मुतगे कृषी पत्तीन सहकारी संघाने कृषी कर्ज देण्यास टाळाटाळ चालविल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी संघाच्या कार्यालयास टाळे ठोकून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याचप्रमाणे जोपर्यंत शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटप सुरू होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनात मुतगे गावासह परिसरातील बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले आहेत. त्याचप्रमाणे सरकारने देखील याची दखल घेऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर कृषी कर्ज वाटप केले जाईल अशी व्यवस्था करावी. याखेरीज मुतगे कृषी पत्तीन सहकारी संघाच्या सेक्रेटरीसह संचालक मंडळावर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.Mutgaa

शेतकऱ्यांच्या या आंदोलनासंदर्भात बोलताना नारायण कणबरकर म्हणाले की गेली अनेक वर्षे मुतगे गावचे भूषण असलेला मुतगे कृषी पत्तीन सहकारी संघ आज रसातळाला गेला आहे. गेल्या कांही वर्षात संचालक मंडळ व सेक्रेटरीने केलेल्या भ्रष्टाचारामुळे शेतकर्‍यांना कृषी कर्ज मिळण्यात अडचण येत आहे. गेल्या दोन-तीन वर्षात पूर्वी देखील जेंव्हा सरकारने कर्ज माफ केले होते, त्यावेळीही येथील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही.

तीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. गेले कित्येक वर्षे येथील शेतकऱ्यांनी अर्ज विनंत्या करून देखील कर्ज देण्यास चालढकल केली जात आहे. आता शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत झाल्यामुळे कालपासून याठिकाणी शेतकरी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. काल पासूनच्या एकंदर घडामोडी पाहता जनाची नाही तर मनाची लाज असेल तर संचालक मंडळाने या समस्येवर ताबडतोब तोडगा काढावा अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा देऊन चालते व्हावे. कारण ही संस्था सर्व शेतकऱ्यांची आहे, संचालकांची नाही. काळजीवाहू म्हणून आम्ही त्यांना निवडून दिले होते. मात्र त्या पात्रतेचे ते नाहीत हे आता सिद्ध झाले आहे असे सांगून जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन कर्जाचे लवकरात लवकर वाटप होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे उपोषण चालूच राहील, असे कणबरकर यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.