Saturday, April 20, 2024

/

विमानतळासाठी बेळगाव सिटीझन कौन्सिलचा ‘रेल कार’चा प्रस्ताव

 belgaum

बेळगाव विमानतळ हे अलीकडे देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडले गेले असून प्रवासी संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. तेंव्हा विमानतळ ते बेळगाव शहरादरम्यान ‘रेल कार’ सेवा सुरू केल्यास ती प्रवाशांसाठी अत्यंत सोयीची ठरेल, असा प्रस्ताव सिटिझन्स कौन्सिल बेळगावतर्फे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या संयुक्त सचिव उषा पाध्ये आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आला आहे.

सिटिझन्स कौन्सिल बेळगावच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त प्रस्तावाचे निवेदन बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांना आज सायंकाळी सादर केले.

बेळगाव विमानतळ हे ब्रिटिशकालीन 1942 साली बांधलेले प्रशस्त विमानतळ आहे. उडान योजनेअंतर्गत या विमानतळावरून देशातील दिल्ली, मुंबई, बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद आदी प्रमुख शहरांना विमानाच्या दररोज 26 हून अधिक फेऱ्या होतात. सर्व सोयी-सुविधा असणाऱ्या बेळगाव विमानतळावरील प्रवाशांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. तथापी खेदाची बाब ही आहे की बेळगाव शहरापासून विमानतळापर्यंत ये -जा करण्यासाठी वाहतुकीची चांगली सोय नाही. त्यामुळे प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागते. वाहतुकीची विशेष सोय नसल्यामुळे विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना अव्वाच्या सव्वा भाड्याचा भुर्दंड सहन करून खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

बेळगाव शहरांमध्ये आता सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यांचा फायदा घेऊन विमानतळ ते शहरापर्यंतच्या प्रवासी वाहतुकीच्या समस्येवर उपाय निघू शकतो. सद्यपरिस्थितीत विमानाने बेळगावला येणार्‍या प्रवाशांना वाहतुकीचा जो त्रास सहन करावा लागतो, त्यावर ‘रेल बस’ किंवा ‘रेल कार’ यांचा पर्याय अत्यंत योग्य ठरणार आहे. यासंदर्भात आमची भारतीय रेल्वेशी देखील चर्चा झाली आहे. बेळगाव रेल्वे स्थानक हे शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील रेल्वे स्थानकापासून सांबरा रेल्वेस्थानकापर्यंत रेल कारची आणि तिथून विमानतळापर्यंत बसची सुविधा उपलब्ध केल्यास ती विमान प्रवाशांसाठी ये -जा करण्यासाठी अत्यंत सोयीची ठरणार आहे.

तेंव्हा आपणही याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बेळगाव शहरापासून विमानतळापर्यंत ये-जा करण्यासाठी रेल कार सेवा सुरू होईल अशी व्यवस्था लवकरात लवकर करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी सिटिझन्स कौन्सिल बेळगावचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्यासह विकास कलघटगी, अरुण कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी बेळगाव लाईव्हशी बोलताना बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी ‘रेल कार’ची सतीश तेंडुलकर यांची कल्पना अतिशय उत्तम असल्याचे सांगून प्रशंसा केली. ते पुढे म्हणाले की, रेल कारमुळे विमानतळ ते बेळगाव शहरापर्यंतची विमान प्रवाशांची वाहतुकीची समस्या दूर होणार आहे. यापूर्वी 2019 साली तत्कालीन खासदार सुरेश अंगडी यांच्या सहकार्याने बस सेवा सुरू केली होती, मात्र कालांतराने ती बंद पडली. आता सिंगल कोच रेल कारची ही कल्पना उत्तम आहे. विमानतळापासून सांबरा रेल्वे स्थानक जवळपास 2 कि. मी. अंतरावर आहे. विमानतळापासून सांबरा रेल्वेस्थानकापर्यंत बसने आणि तेथून रेल्वे सिंगल कोचने अर्थात रेल कारने बेळगाव मुख्य रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचल्यामुळे विशेष करून परगावच्या प्रवाशांची चांगली सोय होणार आहे असे सांगून ज्या विमान प्रवाशांना पुढे रेल्वेने प्रवास करावयाचा आहे त्यांच्यासाठी देखील ही सुविधा सोयीची ठरेल. याखेरीज बेळगाव विमानतळ आणि परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होण्याबरोबरच रस्त्यावरील वाहतुकीचा ताण देखील कमी होईल, असे मौर्य यांनी स्पष्ट केले.

विमानतळ ते बेळगाव शहरापर्यंतच्या विमान प्रवाशांच्या वाहतुकीसाठीच्या आपल्या रेल कारच्या प्रस्तावाबाबत सतीश तेंडुलकर यांनी सविस्तर माहिती देत आहेत इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये रेल कार सेवा सुरू होऊ शकते.देशात बागलकोट, कोलार बंगळुरू गुजरात अश्या 10 ठिकाणी रेल कारचा उत्तर रित्या सुरू आहे बेळगावात सदर सेवा सुरू व्हावी यासाठी विमान तळ प्राधिकरण,दक्षिण पश्चिम रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त माध्यमातून ही सेवा अंमलात आणावी अशी मागणी त्यांनी केली.

https://www.instagram.com/tv/CWno4vAhLl3/?utm_medium=copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.