बेळगाव लाईव्ह :भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रलंबित असलेला महागाई भत्ता तात्काळ अदा केला जावा, या मागणीसाठी ऑल इंडिया बीएसएनएल पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन छेडण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय समोर छेडण्यात आलेल्या या आंदोलनात ऑल इंडिया बीएसएनएल पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशनच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य सदस्य सहभागी झाले होते.
यावेळी प्रलंबित असलेला महागाई भत्ता तात्काळ मिळावा अशी मागणी करत जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच सरकारच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. आपल्या आंदोलनासंदर्भात माहिती देताना एआयबीडीपीए अखिल भारतीय उपाध्यक्ष रामू तटपटी यांनी सांगितले की, प्रलंबित महागाई भत्ता मिळावा यासाठी आज आमच्या विविध 12 संघटनांनी मध्यान्ह आंदोलन हाती घेतले आहे.

जर आमच्या मागणीची पूर्तता झाली नाही तर येत्या 25 एप्रिल रोजी धरणे सत्याग्रह केला जाईल. महागाई भत्त्याचा आदेश निघाल्यानंतर त्याचे तात्काळ वितरण केले गेले पाहिजे. महागाई भत्ता पूर्वीप्रमाणे पुनर्संचयित केला जावा अशी आमची मागणी आहे.
वाढत्या महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार किंवा कंपन्या सरकारी कर्मचारी, सरकारी क्षेत्रातील कामगार आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाई दराशी जुळवून घेण्यासाठी हा महागाई भत्ता देत असते. त्यामुळे वाढत्या महागाईनुसार आम्हाला महागाई भत्ता देणे हे सरकारचे कर्तव्य आहे असे सांगून हा प्रलंबित असलेला भत्ता तात्काळ अदा केला जावा अशी मागणी तटपटी यांनी केली.





