Friday, April 19, 2024

/

अस्मानी संकट : शेतकऱ्यांचे करोडोचे नुकसान

 belgaum

गेल्या कांही दिवसापासून बेळगाव तालुक्यात अवकाळी पावसाचे सावट कायम असताना काल मंगळवारी दुपारीनंतर हजेरी लावणाऱ्या पावसाने सायंकाळी उग्र रूप धारण केले. परिणामी ऐन सुगीच्या हंगामात हजारो एकर जमिनीतील भात पीक पाण्यात बुडाल्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून त्यांचे करोडोचे नुकसान झाले आहे.

सध्या सुगीचा हंगाम सुरू असल्यामुळे शेतकरी कापणी केलेल्या भाताची गंजी घालत होते. भात कापणी केल्यानंतर कांही शेतकरी खळ्यावरच मळणी करतात. ही कामेही सुरू होती. मात्र काल पावसाला सुरुवात झाल्याने मळणीची कामे अर्धवट स्थितीत राहिली. खळ्यावर असलेल्या भातावर प्लास्टिकची ताडपत्री घालण्याकरीता शेतकरी वर्ग धडपडत होता. मात्र सायंकाळी झालेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या या धडपडीवर पाणी फिरले असून कापणी केलेले भात भिजून गेले आहे. अनगोळ, वडगाव, शहापूर, जुने बेळगाव, येळ्ळूर, धामणे, हलगा व माधवपुर या ठिकाणच्या शिवारांमधील हजारो एकर जमिनीतील भात पाण्यात बुडाले आहे.

अनेक शेतकऱ्यांनी दिवाळीच्या दरम्यान भात कापणी केली होती. मात्र दिवाळीत देखील पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यानंतर पावसाळी वातावरण दूर होऊन उघडीप मिळाल्याने शेतकऱ्यांनी जोमाने भात कापणी होती. आता काल सायंकाळी पुन्हा जोरदार पाऊस पडल्यामुळे शेतातील गाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून कापलेले भाग त्यात भिजून गेले आहे. येळ्ळूर, शहापूर, अनगोळ आदी सर्वच शिवारांमध्ये सध्या कापलेल्या भाताच्या व्हळ्या शेतातील पाण्यात भिजत पडलेल्या पाहावयास मिळत आहेत.

सध्या निर्माण होत असलेल्या हलगा -मच्छे बायपास रस्त्या शेजारील भात पिके देखील पाण्यात बुडाली आहेत. त्याचप्रमाणे आताच्या गंज्या घातलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. अवकाळी पावसाच्या या अस्मानी संकटामुळे भात पीक भिजून कोट्यावधी रुपयांचे नुकसान आहे त्यामुळे शासनाने प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई दिली द्यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.Rain paddy

यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना शेतकरी नेते राजू मरवे यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दर वेळी शासनाकडून पुरेशी नुकसानभरपाई दिली जात नाही. बऱ्याचदा अत्यल्प नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला जातो. कालच्या पावसामुळे हजारो एकर जमिनीतील भात पाण्यात बुडून शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. तेंव्हा यावेळी पूर्वीप्रमाणे न करता शेतकऱ्यांबद्दल खरी कळकळ असेल तर शासनाने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि प्रत्येक शेतकऱ्याला योग्य नुकसान भरपाई द्यावी.

कालच्या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यात भर म्हणून जबरदस्तीने अन्यायकारक हलगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम केले जात आहे. या रस्त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडणारा असून ते आणि त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर येणार आहेत. तरी शासनाने याचा गांभीर्याने विचार करून बायपास रस्त्याचे काम त्वरित रद्द करावे, अशी मागणीही राजू मरवे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.