belgaum

बेळगाव शहरातील 1,12,669 घरे /मालमत्तांना आरएफआयडी टॅग मिळाला आहे. त्यामुळे जेंव्हा कचरा संकलन करणारा टॅग रीडरचा वापर करेल त्यावेळी संबंधित घरातून गोळा केलेल्या कचऱ्याची नेमकी माहिती उपलब्ध होणार आहे, असे सांगून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी अधिकाऱ्यांना कचऱ्यासाठी टॅग रीडरचा वापर करण्याची सूचना दिली.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विश्वेश्वरय्यानगर येथील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये आज मंगळवारी आयोजित समन्वय बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे अनिवार्य आहे. तसेच कचऱ्याचे वर्गीकरण झालेच पाहिजे.

bg

यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत टॅग स्कॅनसाठी यापूर्वीच आरएफआयडीची अंमलबजावणी करण्यात आली असून 300 हून अधिक रीडर्सचे वितरण करण्यात आले आहे. महापालिकेने देखील याचा अवलंब करणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी स्पष्ट केले.

स्मार्ट सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या सिटिझन्स मोबाईल ॲपद्वारे टॅग सेवेबाबत जनजागृती केली जावी. कारण आपल्या तक्रारीची तात्काळ दखल घेतली जावी यासाठी नागरिक प्रामुख्याने माय बेळगाव सिटिझन्स ॲप डाउनलोड करत असतात. पोलीस खाते, परिवहन खाते, महापालिका, आरोग्य आणि अग्निशमन खात्याने देखील जनतेला उत्तम सेवा देण्यासाठी कमांड सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सुविधांचा लाभ घेतला पाहिजे.

स्मार्ट सिटी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या सुविधा संबंधित सर्व खात्यांकडे हस्तांतरित केल्या जातीलच, मात्र तोपर्यंत कमांड सेंटरमधील सुविधांचा फायदा घेऊन सर्व खात्याने एकमेकांशी समन्वय साधून उत्तम सेवा द्यावी, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ म्हणाले.Cantrol room

बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीण बागेवाडी यांनी यावेळी बोलताना स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उपलब्ध करण्यात आलेल्या उद्यान, तलाव, हॉस्पिटल इमारती, डिजिटल पॅनल आदी सुविधांची माहिती दिली आणि या सुविधा शहर प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आल्याचे सांगितले. स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेले कमांड अँड कंट्रोल सेंटर हे जनतेला उत्तम सेवा देण्याबरोबरच पोलीस, परिवहन, आरोग्य तसेच अन्य खात्यांच्या सोईसाठी आहे. संबंधित खात्यांनी येथील सुविधांचा लाभ घेऊन नागरिकांना तत्पर सेवा द्यावी, असेही ते म्हणाले.

पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, स्नेहा पी. व्ही. आणि मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी देखील यावेळी आपले विचार व्यक्त करून विविध सूचना केल्या. डॉ. प्रविण बागेवाडी यांनी स्मार्ट सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या कार्याबद्दल बोलताना जागतिक स्थिती प्रणाली अर्थात जीपीएस सिस्टिम, इंटेलिजंट पोल, ग्रीन कॉरिडोर सिस्टीम, स्मार्ट वॉटर सिस्टीम, घनकचरा व्यवस्थापन, माय बेळगाव सिटीझन्स मोबाईल ॲप आदींबद्दल सविस्तर माहिती दिली. आजच्या समन्वय बैठकीस पोलीस, परिवहन, आरोग्य आदी विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.