Friday, April 19, 2024

/

निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात ‘यांनी’ केली तक्रार

 belgaum

बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीची मतदार यादी सदोष होती. ही निवडणूक ईव्हीएम मशीनला व्हीव्हीटॅप मशीन न जोडता घेण्यात आली आहे. अपारदर्शकपणे सरकारी आदेशाच्या (राज्यपत्र) मार्गदर्शक सूचीचे उल्लंघन करणाऱ्या या निवडणूक प्रक्रियेची सखोल चौकशी करून मतदारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज मंगळवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना सादर केले जिल्हाधिकाऱ्याने निवेदनाचा स्वीकारून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्य सरकारने पर्यायाने बेळगाव महापालिकेने 2020 आली नवे प्रभाग राजपत्र (गॅझेट) जारी करून प्रभागांची अवैज्ञानिक तोडफोड केली. याला काहींनी आक्षेप घेऊन न्यायालयात धाव घेतली असून हा दावा अद्याप उच्च न्यायालयासमोर सुरू आहे. याखेरीज तत्कालीन महापालिकेचे सभागृह गेल्या 11 -3 -2019 रोजी बरखास्त झाल्यानंतर नियमानुसार 6 महिन्यात नव्याने महापालिका निवडणूक घेतली गेली पाहिजे होती. परंतु ती घेण्यात आली नाही. नव्याने प्रभाग पुनर्रचना करताना प्रभाग क्रमांक देखील बदलण्यात आले. उदाहरणार्थ आधीच्या 6 क्रमांकाच्या प्रभागाला 51 क्रमांक देण्यात आला आहे, तर 32 क्रमांकाच्या प्रभागाला 4 क्रमांक दिला गेला. याचा फटका संगणक प्रणालीला बसला आहे. उदाहरणार्थ घरपट्टीसाठी चलन भरताना चलन पेपरवर नव्या ऐवजी आधीच्या प्रभागाचा क्रमांक येऊ लागला आहे. या पद्धतीने नव्या प्रभाग पुनर्रचनेनंतर नागरिकांना संभ्रमात टाकले आहे.

मतदार यादी तयार करताना एका प्रभागातील रहिवाशांची नांवे दुसर्‍या प्रभागाच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक 52 मधील लोकांची नांवे प्रभाग क्र. 57 मधील मतदार यादीत गेली आहेत आणि प्रभाग क्र. 51 व 57 मधील लोकांची नावे प्रभाग क्र. 52 च्या मतदार यादीत समाविष्ट आहेत. परिणामी मतदानाची टक्केवारी घटली म्हणजे फक्त 50 टक्के झाली. कांही बाबतीत एका व्यक्तीचे नांव प्रभागाच्या यादीत दोन-तीन वेळा छापले गेले आहे. कांही मतदारांची आडनांवे बदलली आहेत, म्हणजे कन्नडमध्ये देसाई असलेले इंग्रजी देशपांडे झाले आहे किंवा कन्नडमध्ये देशपांडे असलेले इंग्रजीत देसाई झाले आहे.Dc memo

 belgaum

मतदार यादी गेल्या 10 -8 -2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र त्यातील चुका दुरुस्ती आणि नवीन नांवे घालने किंवा जुनी काढणे वगैरे सुधारणेसाठी अत्यंत कमी म्हणजे 8 दिवसाचा कालावधी देण्यात आला. त्यामुळे अनेक लोकांना मतदार यादी तपशीलवार तपासून तक्रार करण्यास वेळही मिळाला नाही. याखेरीज प्रभागाच्या नकाशाप्रमाणे मतदार यादी तयार करण्यात आलेली नाही. त्यामुळे एका प्रभागातील कांही मतदारांची नावे दुसर्‍या प्रभागात गेली आहेत. परिणामी प्रभागांच्या मतदार संख्येमध्ये मोठी तफावत झाली आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास प्रभाग क्र. 51 आणि 52 मध्ये 9600 मतदारांचा फरक आहे. प्रभाग क्र. 52 ची मतदार संख्या 12500 असली तरी या प्रभागाच्या यादीत प्रभाग क्र. 57 मधील मतदारांच्या नावांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त प्रभाग पुनर्रचना आणि आरक्षणाचा दावा उच्च न्यायालयात सुरू असताना अत्यंत घाईगडबडीत बेळगाव महापालिका निवडणूक प्रक्रिया उरकण्यात आली आहे.

सरकारच्या नियमानुसार मतदानावेळी ईव्हीएम मशीन सोबत व्हीव्हीटॅप मशिन जोडले गेले पाहिजे. गेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत ते जोडले गेले होते, मात्र महापालिका निवडणुकीत व्हीव्हीटॅप एव्हीएमला जोडले गेले नव्हते. याखेरीज या दोन्ही मशीन्सचे निवडणुकीपूर्वी मॉक ड्रील झाले पाहिजे होते परंतु ते देखील झाले नाही. एकंदर बेळगाव महापालिकेची नुकतीच झालेली निवडणूक ही पारदर्शक झालेली नाही. तरी या निवडणूक प्रक्रियेतची सखोल चौकशी करून मतदारांना न्याय मिळवून द्यावा, अशा आशयाचा तपशील माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे. यावेळी प्रभाग 22 मधून राजू बिरजे आणि 23 मधून सुधा भातकांडे यांनी तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.