समिती ही चळवळ आहे, मातृभाषेच्या अस्मितेसाठीचे आंदोलन आहे. समिती हा पक्ष नव्हे. पक्ष संपू शकतात,आंदोलनं कधी संपत नसतात. आंदोलने काही काळ क्षीण दिसू शकतात, आंदोलनातली नेतृत्व बदलतात, आंदोलनातील दिशा बदलतात, पण आंदोलनं इष्ट ठिकाणी पोचल्याशिवाय बंद होत नाहीत.
आंदोलनांचे जी ध्येय निश्चित असते. यामुळेच आंदोलनं यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणे जगभर आहेत.ती कट्टरवादी असुद्या,सौम्य असुद्या किंवा अतिरेकी असुद्या,पण काहीना काही स्वरूपात यश संपादन करणे हा आंदोलनाचा गाभा आहे. त्यापार्श्वभूमीवर विचार करता, जरी राष्ट्रीय पक्षांना वाटत असेल की बेळगावातील समिती संपली किंवा समितीचा कोणताही आता अंश उरला नाही. तर हा एक त्यांच्यादृष्टीने भ्रमनिरास ठरू शकतो.कारण समितीचा पाया फार खोलवर रुजलेला आहे. साठ वर्षांचं हे आंदोलन असं तत्कालीन एकाद्या निवडणुकीत उखडून जाईल असं समजणं म्हणजे मुर्खपणाचं लक्षण आहे.
या सगळ्या विषयावर विचार करता समितीची लोकं काही आत्मपरीक्षण करतील असं लोकांना वाटत असेल तर तेही तितकंसं खरं ठरणार नाही कारण समिती कोणत्याही निवडणुकीकडे पहिल्यापासूनच अंतिम ध्येय म्हणून तितक्या गांभीर्याने लक्ष देते असं वाटत नाही. कारण त्यांचा मूळ उद्देश हा सीमाप्रश्न आहे, आणि आंदोलनाशी संबंधित प्रत्येक गोष्टीशी समिती आपली बांधीलकी समजत असली, तरी निवडणुकीतील यश अपयशाला ध्येय म्हणून तितकेसे महत्त्व देत नाही.
मराठी भाषिक जनतेची सीमाभागातील टक्केवारी सिद्ध करण्याइतपतच समिती निवडणुका कडे लक्ष देते. आजवरच्या निवडणुकीतील निकालांचा अभ्यास केल्यास, समितीने आपली मते कायम राखून ठेवली आहेत. 1975 च्या लोकसभा निवडणुकीत समितीच्या आनंद गोगटेयांनी एकूण मतदानाच्या 46 टक्के म्हणजे 80 हजार मते घेतली होती, 1980 साली एकूण मतदानाच्या 22 टक्के म्हणजे 78 हजार मते घेतली होती, 1989 साली ए पी पाटील यांनी 22 टक्के म्हणजे एक लाख तीन हजार मते घेतली होती, 2021 सालाच्या पोटनिवडणुकीत समितीच्या उमेदवाराला 13 टक्के म्हणजे 1 लाख 17 हजार 175 मते पडली होती, कालच्या महानगरपालिकेच्या निवडणूकतही फक्त शहरापुरती मराठी उमेदवारांनी घेतलेली मते 67 हजार आहेत.
बेळगाव बेळगाव दक्षिण मतदारसंघातील जर येळळूर मच्छे व इतर भागातील मराठी भाषिकांची संख्या धरली तर हा आकडा परत लाखाच्या वर जातो. राष्ट्रीय पक्षातील मराठी माणसांची मतेही यात धरली तर हा भाग मराठी बहू लच आहे हे सिद्ध होते.त्यामुळे हा काही समितीचा फार मोठा पराभव झाला असं म्हणता येणार नाही. कारण समितीचा उद्देश हा निवडणुका जिंकणे हा नाही., तर आपले अस्तित्व सिद्ध करणे हे आहे.
राष्ट्रीय पक्षांचा जो बेळगाव महानगरपालिकेत प्रवेश झालेला आहे आणि त्यांनी जे यश मिळविलेले आहे त्या यशाची कारणे खूप वेगवेगळी आहेत.काही लोकांची चुकीची वक्तव्य, जागतिक घडामोडी, त्याचबरोबर कोविडची परिस्थिती आणि व्यवस्थापनातील चुका ही अनेक कारणे आहेत. पैश्याचा भडिमार केला गेला हे एक प्रमुख कारण मानता येईल.राष्ट्रीय पक्षांकडे एक हुकमी यंत्रणा असते, तश्याप्रकारची यंत्रणा एकाद्या आंदोलनाकडे असेलच असे नाही.निवडणुका जिंकणे, सत्ता मिळवणे हे राष्ट्रीय पक्षांचं उद्दिष्ट असतं. त्या माध्यमातून ते विकास करणं, काम करणे हा अजेंडा घेऊन येतात. राष्ट्रीय पक्षाची सत्ताकेंद्री वेगळी यंत्रणा आहे, आणि समितीची आंदोलन केंद्रित यंत्रनाआहे. अशाप्रकारे दोन वेगवेगळ्या पातळीवर त्याचा विचार करावा लागेल.
समितीचं नियोजन व्यवस्थित नव्हतं तरीही समितीनं घेतलेली मतं ही विचारात घ्यायलाच हवीत.तीन ते चार राष्ट्रीय पक्ष या निवडणुकीत उतरलेले असताना सुद्धा प्रत्येक ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर समिती उमेदवारच आहेत. म्हणजे समिती हा पक्ष नसून सुद्धा समिती दुसऱ्या नंबरचा एक तगडा विरोधक आहे. हे राष्ट्रीय पक्षांनी विचारात घ्यावेच लागेल.
राष्ट्रीय पक्षात असणारे विजयी उमेदवार आहेत ते ही बहुतांशी मराठी भाषिक आहेत. यामुळे मराठी मतांची विभागणी झाली असली तरी एकंदर मते इतर भाषिक मतांपेक्षा व इतर धर्मीय मतांपेक्षा मराठी मते खूप जास्त असून ती पुढे अनेक कारणांनी समितीकडे येऊ शकतात.इथल्या मराठी माणसाचे आपल्या मातृभाषेवर इतके प्रेम आहे की यावेळी समितीचे उमेदवार कमी निवडून आल्यामुळे जितकं समितीच्या लोकांना वाईट वाटलं नाही, तितका हा मुद्दा राष्ट्रीय पक्षातील मराठी माणसांच्या जिव्हारी लागलेला आहे. त्यांना वाटतंय की समितीचा पराभव हा आपण केलेला एक फार मोठा गुन्हा आहे. हीच समितीच्या यशाची पुढची नांदी आहे.
राष्ट्रीय पक्षांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा पाया तयार करण्यासाठी इथे मराठी माणूसच उपयुक्त ठरलेला आहे.हा मराठी माणूस कधीही समितीकडे परत वळू शकतो.तो अंगार आणि ती चेतना जर मराठी माणसांनी तयार केली, तर केंव्हाही बेळगावातून राष्ट्रीय पक्ष हद्दपार होऊ शकतात.कुंपणावर बसून बेळगावातील समिती आणि बेळगावातील समितीचे आंदोलन याविषयी टिपणी करताना, बेळगावातील समितीचे आंदोलन नीट समजून घेणे गरजेचे आहे. भाषेसाठी चाललेलं जगातील हे सर्वात मोठं आणि दीर्घकालीन आंदोलन आहे. अनेक लोकांचा यात त्याग आहे.