बेळगाव शहरातील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेली विकास कामे लवकरात लवकर दिलेल्या ठराविक अंतिम मुदतीत पूर्ण करा अन्यथा कारवाईला तोंड देण्यास तयार रहा, असा इशारा बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या अधिकार्यांची विकास कामांसंदर्भातील आढावा बैठक आज मंगळवारी सकाळी पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन आमदार बेनके बोलत होते. शहरातील स्मार्ट सिटी योजनेची विकास कामे धिम्या गतीने सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्याने, त्याचप्रमाणे शहरातील पथदीप आणि आरओ वॉटर फिल्टरच्या गैरव्यवस्थापनाची दखल घेऊन आमदारांनी त्यासंदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारताना संबंधितांना चांगलेच धारेवर धरले.
तसेच हाती घेतलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी उपस्थितांना ठराविक अंतिम मुदत देऊ केली. या मुदतीत संबंधित सर्वांनी हाती घेतलेली विकास कामे जलद गतीने पूर्ण करावीत अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आमदार अनिल बेनके यांनी स्पष्ट केले
सदर बैठकीत बेळगाव उत्तर मतदारसंघातील उद्यानांचा विकास, मुख्य सर्कल अर्थात चौकांचा विकास, सैनिक पार्कची उभारणी, अनुभव मंडप आणि आर्ट गॅलरीची उभारणी आदींबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण बागेवाडी, कार्यकारी अभियंता पी. एम. पाटील व कामत यांच्यासह अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होता.
दरम्यान, बेळगाव शहरात पंतप्रधान आवास योजना (आरएवाय) राबविण्यासंदर्भात आमदार ॲड. अनिल बेनके यांनी काल सोमवारी आरएवाय बेंगलोरच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा केली. सर्वांना घरे मिळाली पाहिजेत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनानुसार बेळगाव शहरात पंतप्रधान आवास योजना राबविण्याच्या उद्देशाने योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना कर्जासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार वगैरे बाबी बाबत आमदार बेनके यांनी आरएवायच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा केली.