वाढती महागाई, भाषिक अल्पसंख्यांक नागरिकांचे हक्क आणि योग्य रीतीने कोविड व्हॅक्सिनेशन व्हावे या मागण्यांसाठी बेळगाव शहरात कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन सादर करण्यात आले असून लवकरात लवकर सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनामध्ये वाढत्या इंधन दरा संदर्भातील मुद्द्यावर प्रकर्षाने भाष्य करण्यात आले आहे. इंधन दर वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला वाहने चालवणे अवघड होऊन बसले आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून इंधन दर तातडीने कमी करण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली आहे .
कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागात शेतकऱ्यांवर जाचक कायदे आणि नियम त्रासदायक ठरत असून शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणारे कायदे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
भाषिक अल्पसंख्यांकांना त त्यांचे हक्क मिळत नाहीत, त्यामुळे भाषिक अल्पसंख्यांकांना सुरक्षितपणे जगता यावे या दृष्टीने हक्क मिळवून द्यावेत आणि कोरोना लसीकरणाचे नियम नियोजन योग्य पद्धतीने करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
ऍड नागेश सातेरी, कला सातेरी यांच्या बरोबरीनेच कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा विभागाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.