मराठी भाषिकांच्या धास्तीने सोमवारी मध्यरात्री महापालिका कार्यालयासमोरील वादग्रस्त लाल -पिवळा ध्वज बदलण्यात आला आहे. गेल्या आठवडाभरापासून या ठिकाणच्या पोलीस बंदोबस्तात वाढ केलेली असताना देखील चोरट्यांप्रमाणे झेंडा बदलाचा हा प्रकार घडला आहे. तथापी पोलिसांनी मात्र झेंडा कोणी बदलला आपल्याला माहित नाही असा पवित्रा घेतला आहे. महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी देखील याबाबत मौन पाळले आहे.
कन्नड संघटनेचा म्होरक्या श्रीनिवास ताळुकर, कस्तुरी भावी आदींनी गेल्या 28 डिसेंबर रोजी बेळगाव महापालिकेसह लाल -पिवळा झेंडा फडकविला. तो झेंडा जीर्ण झाल्याने बदलण्यासाठी ताळुकर व त्याचे सहकारी गेल्या 5 जुलै रोजी महापालिकेसमोर गेले होते. त्यांनी जुना झेंडा काढून नवा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी त्यांना आडकाठी केली होती. त्यावेळी कन्नड कार्यकर्ते व पोलिसात शाब्दिक चकमक झाल्यानंतर पोलिसांनी ताळुकर व त्याच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. मार्केट पोलिसांनी या प्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हाही नोंदविला होता. त्यानंतर या झेंडा बाबत कन्नड भाषिकांना चिथावण्याचे काम ताळुकर याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू ठेवले होते.
ताळुकर कंपुच्या प्रयत्नानंतर गेल्या 12 जुलै रोजी कस्तुरी भावी या महिलेने महापालिकेसमोरील झेंडा बदलण्याचा प्रयत्न केला होता. त्या महिलेला देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले होते. या दोन्ही घटनांप्रसंगी पोलीसांनी कडक भूमिका घेतल्यामुळे तेथे नवा झेंडा फडकविला जाणार नाही अशी अपेक्षा व्यक्त होत होती, परंतु ती फोल ठरली आहे.
दरम्यान, बेळगाव महापालिकेसमोर राज्य शासनानेच लाल पिवळा झेंडा फडकवावा अशी मागणी विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी केली आहे. मंगळवारी बेळगाव दौऱ्यावर आलेल्या होरटी यांनी यासंदर्भात सरकारकडे मागणी करणार असल्याचे सांगितले.
कर्नाटकात लाल -पिवळा झेंडा फडकवायचा नाहीतर मग अन्य कुठे? असा सवालही त्यांनी केला. याआधी शिक्षणमंत्री असताना होरट्टी यांनी मराठी शाळांबाबत पक्षपाती भूमिका घेतली होती. आता झेंडाच्या बाबतीत ही त्यांनी मराठी द्वेष दाखवून दिला आहे.