Saturday, April 20, 2024

/

जल मिशन योजनेची करा व्यवस्थित अंमलबजावणी : कारजोळ

 belgaum

केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन या पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी केली जावी, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आज पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना दिली.

सुवर्ण विधानसौध येथे आज गुरुवारी सकाळी आयोजित त्रैमासिक केडीपी बैठकीमध्ये ते बोलत होते. पेयजल पुरवठा योजनेचे महत्त्व लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशभरात जल जीवन मिशन ही पिण्याच्या पाण्याची योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत कर्नाटक सरकारला 5 हजार कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे.

सदर योजना बेळगाव जिल्ह्यात व्यवस्थितरीत्या राबविण्यात यावी, असे यावेळी बोलताना पालकमंत्री कारजोळ यांनी सांगितले. मुरगोड येथे पाणीपुरवठा योजना राबविण्याबाबतीत आवश्यक असलेला वीज पुरवठा केला जावा. यासाठी एक्सप्रेस फिडर लाईन तयार करावी, अशी सूचना देखील त्यांनी दिली. विधान परिषदेचे मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ यांनी जल जीवन मिशन मध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन हा आराखडा तयार केला जावा, अशी सूचना अधिकार्‍यांना दिली.

कोरोना प्रादुर्भावाचा संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आवश्यक ती उपाययोजना केली जावी. या लाटेशी यशस्वी मुकाबला करण्यासाठी सर्व हॉस्पिटल्स, डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सज्ज राहावे. कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी जास्त धोकादायक असल्याने त्यादृष्टीने योग्य ती तयारी केली जावी. उपचारासाठी सर्व वैद्यकीय सोयीसुविधा आणि साधनसामग्री तयार ठेवावी, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. एस. व्ही. मुन्याळ यांनी मुलांवरील उपचारासाठी 450 ऑक्सिजन बेड्स तयार ठेवण्यात आले आहे. त्याच प्रमाणे तालुक्याच्या हॉस्पिटल्सना व्हेंटिलेटर्स देण्यात आले आहेत. डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आलेले आहे, अशी माहिती दिली.

कृषी खात्याचे संचालक शिवणगौडा पाटील यांनी यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असल्याचे सांगून बियाणे आणि खतांचा कोणताही तुटवडा नसल्याचे सांगितले त्याप्रमाणे जिल्ह्यात 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.Kdp meeting

खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी संपूर्ण खानापूर तालुक्यात अद्याप एकही बहु ग्राम पिण्याच्या पाण्याची योजना राबविण्यात आलेली नाही याकडे साऱ्यांचे लक्ष वेधून सदर योजना तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस खानापूर तालुक्यात पडतो. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक पाण्याचा साठा उपलब्ध होऊ शकतो. त्याचा फायदा घेऊन तालुक्यात बहूग्राम पिण्याच्या पाण्याची योजना राबविली जावी असे आमदार निंबाळकर यांनी सांगितले. बिडीसह तीन ठिकाणी योजना मंजूर करावी असेही त्या म्हणाल्या. त्यावर जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी पाणीपुरवठा योजनेसाठी मुबलक निधी उपलब्ध आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही असे सांगून खानापूर तालुक्यातील संबंधित तीन ठिकाणी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यास संदर्भातील आराखडा तयार करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली.

सदर बैठकीस खासदार मंगला अंगडी, विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन, पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन आदींसह संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.