कसदार अभिनय आणि एक असामान्य प्रतिभेच्या जोरावर तब्बल सहा दशके हिंदी चित्रपट सृष्टीत अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते मोहम्मद युसुफ खान उर्फ दिलीपकुमार यांचे काल बुधवारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बेळगावशी जोडल्या गेलेल्या त्यांच्या कांही आठवणी ताज्या झाल्या आहेत.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे एकेकाळी बेळगावला येणे-जाणे होते. बेळगावचे उद्योजक इक्बाल सेठ यांच्याशी त्यांचे घरगुती संबंध होते. त्यामुळेच त्याकाळी तीन-चार वेळा ते बेळगावला येऊन गेले होते.
शहरातील बाशिबन एज्युकेशन सोसायटीने 1983 साली बाशीबन हायस्कूलच्या कोनशिला समारंभानिमित्त आयोजित केलेल्या कल्याणजी-आनंदजी नाईटला उपस्थित राहण्यासाठी दिलीपकुमार, सायरा बानू आणि अन्य फिल्मी कलाकार बेळगावला आले होते. त्यावेळी अझमनगर येथील अल अमीन इंग्लिश मिडीयम हायस्कूलच्या उद्घाटन समारंभाला दिलीप कुमार सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
त्यानिमित्ताने डॉ. मुस्ताक जमादार, हमीद सेठ, डॉ. झेड. एफ. हफीज यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले होते. माजी आमदार फिरोज सेठ यांच्या परिवाराशी देखील दिलीपकुमार यांचे चांगले संबंध होते.
त्याकाळी दिलीप कुमार यांनी आपल्या बेळगाव भेटीप्रसंगी जोहरे गुफ्तार या उर्दू वृत्तपत्राचे संपादक फारुख हन्नन यांच्या उर्दू पत्रकारितेचेही कौतुक केले होते.