Thursday, April 18, 2024

/

सोमवार पासून कर्नाटकात अनलॉक : अशी आहे मार्गदर्शक सूची

 belgaum

कर्नाटकातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी असणाऱ्या बेळगावसह राज्यातील 16 जिल्ह्यांमधील लॉक डाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार उद्या सोमवार दि. 21 जूनपासून अनलॉक जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शनिवारी बेंगलोर येथे पत्रकार परिषदेमध्ये तशी घोषणा केली आहे.

कोरोनाचा पॉझिटिव्ह रेट 5 टक्क्यांच्या खाली असलेल्या बेळगावसह कारवार, बागलकोट, हावेरी, गुलबर्गा, मंड्या, कोप्पळ, चिकबळ्ळापूर, तुमकुर, कोलार, बेंगलोर शहर, रायचूर, रामनगर, यादगिर आणि बिदर जिल्ह्यात उद्या सोमवारपासून अनलॉक जारी होणार आहे. अनलॉकचा हा आदेश येत्या 5 जुलैपर्यंत म्हणजे दोन आठवडे जारी राहणार आहे. या जिल्ह्यांमधील सर्व दुकाने सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे हॉटेल, बार ,रेस्टॉरंट, क्लब सायंकाळी 5 वाजेपर्यंत 50 टक्के ग्राहकांच्या प्रवेशासह कोरोनाचे नियम पाळून सुरू करता येतील.

मात्र येथे मद्यपान व एसीचा वापर करता येणार नाही. बारमध्ये मद्यप्राशन करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, केवळ पार्सल नेण्याची मुभा देण्यात आली आहे. अनलॉक काळात मॉल, सर्व प्रार्थना स्थळे, मंदिरे बंद राहतील. सार्वजनिक कार्यक्रम आणि सभा -समारंभाच्या आयोजनावरही निर्बंध असणारा आहे. शाळा महाविद्यालय बंद राहणार असली तरी शैक्षणिक पूर्वतयारीसाठी शिक्षकांना शाळेत जाता येईल. स्विमिंग पूल व चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. सरकारी आणि खासगी कार्यालये 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करता येतील.

 belgaum

विवाह समारंभासाठी असणारे नियम आणखी शिथील करण्यात असल्यामुळे विवाह समारंभात कमाल 100 जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र फेसमास्कचा वापर व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. बेंगलोर शहर परिवहन मंडळासह राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी केली आहे. मात्र संसर्गाचा धोका लक्षात घेऊन बसमध्ये आसन क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांनाच प्रवेश दिला जाणार आहे. शिवाय आंतरराज्य प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ऑटोरिक्षा व टॅक्सी या प्रवासी वाहनांना देखील सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत मुभा असणार आहे.

Yediyurappa
Yediyurappa cm

सर्व उत्पादन केंद्रे/ औद्योगिक आस्थापने/ उद्योग 50 टक्के मनुष्यबळासह कोरोना नियमांचे पालन करून सुरू ठेवण्यास परवानगी असेल. तथापी वस्त्रोद्योगाशी संबंधित उत्पादन केंद्र, औद्योगिक आस्थापने व उद्योगाच्या बाबतीत मनुष्यबळाची मर्यादा 30 टक्के असणार आहे. आउट डोअर शूटिंग 50 टक्के क्षमतेसह चालू करण्याची परवानगी आहे.

राज्यातील जिम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी त्या ठिकाणी 50 टक्के प्रवेश देता येणार आहे. शिवाय एसीचा वापर न करण्याची अट असणार आहे. क्रीडांगणे प्रेक्षकांशिवाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धा भरविणे आणि सराव करण्यास क्रीडापटूंना अनुकूल होणार आहे.

मागील आठवड्याभरात 16 जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी आल्यामुळे या ठिकाणी अनलॉक करण्यात आला असला तरी उर्वरित जिल्ह्यांमधील दर 5 ते 10 टक्के या दरम्यान असल्यामुळे तेथे पूर्वीचेच नियम कायम ठेवण्यात आले आहेत. म्हणजे येथे केवळ सकाळी 6 ते दुपारी 2 या वेळेतच मर्यादित व्यवहार सुरू राहतील. म्हैसूरमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असल्याने तेथे संपूर्ण लाॅक डाऊन लागू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.