Friday, September 13, 2024

/

कोरोना मृतांना ‘हा’ शववाहिका चालक देतो अखेरचा निरोप

 belgaum

आपल्या कामाशी समर्पित असणारा महापालिकेच्या शववाहीकेचा चालक निसार अहमद अब्दुल गणी समशेर यांने माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपल्या कर्तव्य पलीकडे कार्य करून कोरोना वॉरियर म्हणून आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गेली 13 वर्षे बेळगाव महानगरपालिकेमध्ये काम करणारा समशेर लोकांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी शववाहिकेतून स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्याबरोबरच वेळप्रसंगी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे कार्य देखील करतो. परंतु कोरोना प्रादुर्भावाला प्रारंभ झाल्यापासून मृतदेह स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्याचे हे काम त्याच्यासाठी मोठे आव्हान ठरले असून त्याने ते यशस्वीरित्या पेलले आहे.

आपल्या कामासंदर्भात बोलताना नासिर अहमद अब्दुल गणी समशेर म्हणाला की, महापालिका व्याप्तीतील निधन पावलेल्या जवळपास 40 ते 50 लोकांचे मृतदेह मला दरमहा अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीपर्यंत पोहोचवावे लागतात. मात्र सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात 70 ते 80 पेक्षा जास्त लोकांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जावे लागत असून त्यामध्ये बहुतांश जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले असतात.

कोरोनाची भीती मनात असल्यामुळे बऱ्याचदा मृतांचे नातलग स्वतः अंत्यसंस्काराचे विधि करण्यास तयार नसतात. त्याचप्रमाणे बरेच जण मृत व्यक्ती कोरोना बाधित असल्यामुळे मृतदेह ताब्यात घेण्यासही नकार देतात ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, असे समशेर म्हणाला.Samsher  ambulance driver

नातलग मृतदेहाला हात लावण्यास तयार नसल्यामुळे बऱ्याचदा समशेरला स्वतः पुढाकार घेऊन संबंधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागतात. यासाठी मृतांचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी लागणारी रक्कम समशेरकडे सुपूर्द करत असतात. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी 2000 ते 3000 रुपये खर्च येतो. समशेर फक्त अंत्यसंस्कार अस करत नाही तर त्यानंतर मृताच्या रक्षा गोळा करून त्या त्याच्या नातलगांच्या घरापर्यंत नेऊन पोचविण्याचे काम देखील करतो.

नासिर अहमद अब्दुल गणी समशेर याची दररोजची कामाची वेळ सकाळी 6 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत आहे. तथापि सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव काळात त्याचे कामाचे वेळापत्रक व्यस्त झाले आहे. माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपल्या कर्तव्य पलीकडे कार्य करणाऱ्या समशेर याची महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होत असते.

त्याचप्रमाणे कांही सेवाभावी संघटनांनी त्याच्या कार्याची दखल घेऊन त्याचा सत्कार देखील केला आहे. लोकांना मदत करणे मला आवडते आणि मी जे काम करतो ते माझ्या आवडीला साजेसे आहे असे सांगून मी करत असलेल्या सत्कार्याबद्दल देवाचे आशीर्वाद मला मिळतील आणि ही गोष्ट मला पैसे कमावण्यापेक्षा अधिक महत्त्वाची वाटते, असे नासिर अहमद अब्दुल गणी समशेर म्हणतो.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.