belgaum

गणेशोत्सवापूर्वी बेळगाव खड्डेमुक्त करा: अमर येळ्ळूरकर

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते अॅड. अमर येळ्ळूरकर यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, गणेशोत्सवापूर्वी शहर खड्डेमुक्त करण्याची मागणी केली आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रस्त्यांची डागडुजी व विकासकामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, पावसाच्या काळातच एल अँड टी कंपनीसह विविध यंत्रणांकडून शहरभर रस्त्यांची खुदाई सुरू असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील विविध भागांची पाहणी केल्यानंतर अॅड. येळ्ळूरकर यांनी महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित ठेकेदारांच्या कामकाजावर टीका केली. “बेळगाव शहर आज खड्ड्यांनी व्यापले आहे, याला नेमके जबाबदार कोण?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 belgaum

ज्या गल्ल्यांमध्ये रस्त्यांची खुदाई करण्यात आली आहे, त्या भागातील प्रत्येक गणेश मंडळाला संबंधित ठेकेदार आणि महापालिका प्रशासनाने लेखी हमीपत्र द्यावे. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी सर्व खड्डे बुजवून रस्ते पूर्ववत केले जातील, अशी स्पष्ट हमी प्रशासनाने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

महापौर, महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित ठेकेदार यांनी संयुक्तपणे शहरातील सर्व प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून गणेशभक्त आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खात्री द्यावी, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या रस्त्यांच्या पाच वर्षांच्या हमीचाही मुद्दा उपस्थित केला. हमी कालावधी सुरू असतानाही पुन्हा मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची खुदाई होत असल्याने या रस्त्यांच्या गुणवत्तेची आणि हमीची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.