बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सुरू असलेल्या लढ्याला बळ देण्याच्या उद्देशाने खानापूर-बेळगाव येथून पुण्यात स्थायिक झालेल्या युवक व नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी (४ जुलै) पुणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेऊन सीमाप्रश्नासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
शिष्टमंडळामध्ये गणपती पाटील, विश्वनाथ पाखरे, वैराळ सुळकर आणि मारुती पाटील यांचा समावेश होता. ही भेट घडवून आणण्यासाठी जावळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष हेमंत हिंदुराव शिंदे यांनी विशेष सहकार्य केले.
भेटीदरम्यान विश्वनाथ पाखरे यांनी सीमाभागातील मराठी भाषेची होत असलेली गळचेपी, मराठी भाषिकांवरील कथित भाषिक अन्याय, दाखल होणारे खोटे गुन्हे, कन्नड सक्ती तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाची सद्यस्थिती याबाबत आमदार शिंदे यांना माहिती दिली.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी सीमाप्रश्न हा केवळ सीमावासीयांचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडित प्रश्न असल्याचे सांगितले. गेली सुमारे ७० वर्षे हा प्रश्न प्रलंबित असून, पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी त्याकडे आवश्यक ते गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रात सीमाप्रश्नाबाबत व्यापक जनआंदोलन उभे राहणे गरजेचे असून, राज्य व केंद्र सरकारवर लोकशक्तीच्या माध्यमातून दबाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. पुण्यातील सीमावासीयांनी उभारलेल्या लढ्याला आपण जाहीर पाठिंबा देत असून, पक्षभेद बाजूला ठेवून हा लढा अधिक व्यापक करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासनही त्यांनी शिष्टमंडळाला दिले.




