अश्लील व्हिडीओ प्रकरण सध्या तापू लागले असून जलसंपदा मंत्री पदाचा राजीनामा देणाऱ्या रमेश जारकीहोळी यांच्या समर्थकांनी आज मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्यात बरोबरच संबंधित व्हिडिओ खोटा असल्याचा आरोप करून सखोल चौकशीची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.
माजी जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर अश्लील व्हिडिओ संदर्भात जो आरोप करण्यात आला आहे त्याच्या निषेधार्थ रमेश जारकीहोळी अभिमानी संघटनेच्यावतीने आज कित्तूर चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. त्याचप्रमाणे अश्लील व्हिडिओ हे एक राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप करत बेळगावातील रमेश जारकीहोळी यांच्या समर्थकांनी देखील आक्रमक पवित्रा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आंदोलन केले.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नांवे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. रमेश जारकीहोळी अभिमानी संघटनेचे कार्यकर्ते आणि जारकीहोळी यांचे हितचिंतक समर्थक यांच्या गर्दीमुळे आज जिल्हाधिकारी कार्यालय फुलून गेले होते.
यावेळी बोलताना बेळगावचे माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी रमेश जारकीहोळी यांच्यावर करण्यात आलेले आरोप निखालस खोटे असल्याचे सांगून हे एक राजकीय षडयंत्र असल्याचे स्पष्ट केले. दिनेश कल्लहळ्ळी हा माहिती अधिकार कार्यकर्ता खोटे आरोप करत असून हे समाजाला घातक कृत्य आहे. आमचे नेते रमेश जारकीहोळी यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देऊन खुल्या चौकशीस तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.
तेंव्हा जारकीहोळी समर्थक आणि समस्त बेळगाववासियांतर्फे या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी अशी आम्ही मागणी करत आहोत. ज्या युवतीच्या नांवाने हा जो हलकल्लोळ झाला आहे ती युवती कोठे आहे? याचा थांगपत्ता लावला जावा. आम्हाला विश्वास आहे की आमचे नेते रमेश जारकीहोळी या प्रकरणात निर्दोष आहेत. समस्त जारकीहोळी कुटुंब आजतागायत जनसेवेचे अग्रेसर असताना एका राजकीय षडयंत्राद्वारे त्यांच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. या आरोपांची शहानिशा करण्यासाठी सीआयडी, सीओडी अथवा सीबीआय चौकशी करून जनतेसमोर सत्य आणावे अशी आमची मुख्यमंत्री माननीय बी. एस. येडियुरप्पा यांच्याकडे मागणी आहे, असे शिवाजी सुंठकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
रमेश जारकीहोळी अभिमानी संघटनांच्या नेतेमंडळींनी देखील सुंठणकर यांच्याप्रमाणेच प्रतिक्रिया व्यक्त करताना रमेश जारकीहोळी यांचे राजकीय खच्चीकरण करण्यासाठी अश्लील व्हिडिओचे षडयंत्र रचण्यात आले असल्याचा आरोप केला.
https://www.facebook.com/livebelgaum/videos/236416221455676/