Monday, May 6, 2024

/

बेळगावमधील गुन्हेगारी ‘बे’लगाम की वादळापूर्वीची शांतता?

 belgaum

बेळगावचे पर्यावरण जसे थंड आहे तसेच बेळगावमधील वातावरण देखील शांत आहे. अपवाद वगळता कायदा आणि सुव्यवस्थेच्या जोरावर बेळगाव शांत असल्याचे म्हटले जाते. परंतु सध्या बेळगावमधील ‘हायटेक’ अवैधप्रकार धक्कादायकरीत्या समोर येत असून बेळगावमधील वातावरण कितपत सुरक्षित आहे? यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

टिळकवाडी आणि सदाशिवनगर मध्ये चालणाऱ्या अवैध उद्योगांचा सायबर  व ए पी एम सी पोलिसांनी पर्दाफाश केला. टिळकवाडी येथील मसाज सेंटर आणि सदाशिवनगर येथे सुरु असलेला वेश्या व्यवसाय हे शहरातील नव्याने सुरु असलेले अवैध प्रकार नसून गेल्या काही दिवसांपासून असे अनेक प्रकार राजरोसपणे सुरु आहेत. पोलीस विभागाच्यावतीने अशा गैरप्रकारांवर कारवाई देखील करण्यात येत आहे. परंतु असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे बेळगावच्या प्रतिमेला धक्का पोहोचत आहे.

एकीकडे महिला सबलीकरण आणि महिला सुरक्षितता याकडे सरकार सकारात्मकरित्या पाऊल पुढे टाकत आहे. अनेक विभागामध्ये महिला आरक्षण जाहीर करून महिलांचे समाजातील स्थान उंचावण्याच्या प्रयत्नात सरकार असून दुसऱ्या बाजूला महिलांवरील अत्याचार, अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार हे प्रकारदेखील कमी नाहीत. अशा प्रकारणांमधील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई देखील करण्यात येत आहे.

 belgaum

परंतु सर्व अनुचित प्रकार घडल्यानंतर कारवाई करून केवळ न्याय मिळू शकतो मात्र महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणती पाऊले उचलण्यात येत आहेत? महिला खरंच सुरक्षित वातावरणात आहेत का? महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण हे मुद्दे केवळ भाषण आणि कागदोपत्रीच आहेत का? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबरोबरच बेळगावमध्ये इराणी टोळीच्या माध्यमातून चोरी, घरफोडी सारख्या घटनांचीही मालिका मध्यंतरी सुरु झाली. ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी मंदिरात चोरी झाली. त्यासोबतच महिलांचे दागिने लांबविण्याचे प्रकारही वाढीस लागले. गांजा विक्री, अवैधरित्या मद्य वाहतूक अशा अनेक घटनाही हल्ली हल्लीच उजेडात आल्या आहेत. जसजशी हि प्रकरणे उजेडात येत आहेत, याचा विचार करता या गोष्टींची पाळेमुळे अजूनही खोलवर रुतली आहे का? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

हा सारा प्रकार पाहता बेळगावमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या अस्तित्वाचा प्रश्न भेडसावत आहे. बेळगाव पोलीस विभागात तगडे अधिकारी कार्यरत आहेत. बेळगावमध्ये सुरु असलेल्या सर्व बेकायदेशीर गोष्टींना लगाम लावण्याची तसेच या गोष्टींवर कारवाई करण्याची मोहीम या अधिकाऱ्यांच्या पथकाची सुरु आहे. मात्र दिवसागणिक अनेक अवैध, बेकायदेशीर गोष्टी उजेडात येत असून बेळगावच्या शांत प्रतिमेला तडा जाण्याची आणि बेळगावची प्रतिमा मालिन होण्याची शक्यता आहे.

-वसुधा कानूरकर

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.