चिक्कमंगळूर येथील दौरा मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी एक दिवस ठरला होता, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत मला कोणतीही माहिती नाही. चिक्कमंगळूर जिल्हा प्रशासनाला माझ्या दौऱ्याची पूर्वकल्पना एकदिवस आधीच देण्यात आली होती. या मंत्रिमंडळ विस्तारामुळे माझे नुकसान झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांवर झळकत असून अशा चुकीच्या बातम्यांना आपण कंटाळलो असल्याचे मत पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्रिमंडळ विस्तार माझ्यासाठी ‘डॅमेज’ असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांवर झळकत असून, अशा बातम्यांना आपण आता कंटाळलो आहोत. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत घेतलेल्या निर्णयाशी मी कटिबद्ध आहे. मार्च नंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असून, त्यादरम्यान मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. बेळगावमधील अभय पाटील यांच्यासह अनेकजण मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. सर्वजण माझे स्नेही आहेत. त्यामुळे कोणालाही मंत्रिपद मिळाले, तर मला आनंदच असल्याचे मत रमेश जारकीहोळींनी व्यक्त केले.
केंद्र सरकारने अंमलात आणलेला कृषी कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात अंमलात आणला असल्यामुळे देशभर आंदोलन करण्यात येत आहे. दिल्ली येथे होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी बोलताना ते म्हणाले कि, भारतात लोकशाही आहे. प्रत्येकाला विरोध करण्याचा अधिकार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री समर्थ आहेत. त्यांच्या समस्यांचे निराकरण मुख्यमंत्री करतील.
कोविड लसीकरणाबाबतीत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले कि, कोविड लसीकरण मोहीम देशभर सर्वत्र सुरु आहे. कोणीही निःसंकोचपणे हि लस घ्यावी. या लसीकरणाबाबत चुकीच्या अफवा पसरविल्या जात आहेत. परंतु जागतिक स्तरावर या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असून जनतेने या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.