Thursday, April 18, 2024

/

गत वर्षात “कोरोना” ठरला साहित्याचा केंद्रबिंदू

 belgaum

बेळगांवच्या बाबतीत असो किंवा जागतिक बाबतीत गतवर्षात कोरोना हा साहित्याचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याचप्रमाणे कोरोना परिस्थितीमुळे बांधले गेलेले किंवा तुटलेले परस्परसंबंध याचा आढावा आगामी साहित्याचा विषय ठरेल, असे मत कामगार नेते व सामाजिक विषयावरील अभ्यासक अनिल आजगांवकर यांनी व्यक्त केले.

नववर्षाच्या स्वागतानिमित्त बेळगांव लाईव्हशी बोलताना गतवर्षासंदर्भात विशेष करून साहित्य क्षेत्राच्या बाबतीत आजगांवकर यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. अनिल आजगांवकर म्हणाले की, नववर्षात पदार्पण करताना गतवर्ष विशेषकरून साहित्यासाठी कसे गेले यावर दृष्टीक्षेप टाकला असता, बेळगांवच्या बाबतीत बोलायचे तर ज्या साहित्यिक बैठका येथे होत असत किंवा साहित्य संमेलन, सभा व अन्य कार्यक्रम होत असत ते सर्व कोरोना प्रादुर्भावामुळे बंद पडलेले दिसून आले. त्यामुळे जेंव्हा प्रत्यक्षात चर्चा होत नाही किंवा साहित्याची देवाण-घेवाण होत नाही हे लक्षात येताच कांही गटांनी ऑनलाइन साहित्यिक चर्चा, साहित्याची देवाणघेवाण हा मार्ग निवडला आणि आणि तो मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसून आले.

दुसऱ्या बाजूला साहित्य निर्मिती पूर्णपणे कोरोना केंद्रित झालेली दिसून आली. कोरोना संदर्भातील जे विषय होते त्यात असे दिसून आले की भारतात मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगार आणि विशेषता असंघटित कामगारांनी स्थलांतर केले. कांही पायी चालत गेले, कांहीजण जथ्थ्याने पुढे निघाले, वाहनांचा अभाव होता. त्यावेळी त्यांच्यावर जी भीषण परिस्थिती ओढवली, त्यांचे मृत्यू झाले, त्यांचे जे हाल झाले हा सगळा विषय साहित्याचा विषय ठरला, असे आजगांवकर म्हणाले.Anil agaonkar

 belgaum

आर्थिक क्षेत्रात पाहिले तर कारखानदारी, उद्योगधंदे आणि व्यापारावर देखील कोरोनाचे संकट कोसळले होते आणि त्यामुळे व्यापार विश्वाची आणि रोजगाराची खूप मोठी हानी झाल्याचे दिसून येते. आरोग्य क्षेत्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर आरोग्य सेवा, आरोग्य कर्मचारी आणि रुग्ण यांचे परस्पर संबंध कसे होते आणि नेमक्या काय -काय घटना या काळात घडल्या हा देखील एक साहित्याचा विषय झाला तर आश्चर्य वाटू नये. एकंदरच या काळात कुटुंब जवळ आली आणि कुटुंबांचे परस्पर संबंध जुळून आले. अशा परिस्थिती कायम आपल्या नोकरी-व्यवसायात व्यस्त असलेली आणि संध्याकाळी कांही काळ एकत्र येणारी कुटुंब संचार बंदीमुळे दिवसेंदिवस अधिकच एकमेकांजवळ आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे एकमेकांचे ऋणानुबंध, एकमेकांच्या स्वभावातील वैशिष्ट्ये किंवा गुणदोष प्रत्येकाला समजून आले. परिणामी कुटुंबव्यवस्थेवर संपूर्णपणे कोरोनाचा परिणाम झालेला दिसून आला.

कुटुंबव्यवस्थेवर कोरोनाचा परिणाम निश्चित कसा झाला? हा देखील एक साहित्यिक विषय म्हणायला हरकत नाही. एकूणच बेळगावच्या बाबतीत असो किंवा जागतिक बाबतीत गतवर्षात साहित्याचा केंद्रबिंदू कोरोना ठरला आहे. साहित्यिक विषयावर, मुद्रणावर, सभा, संमेलन आणि चर्चांवर पूर्णपणे कोरोनाचा प्रभाव मागील वर्षात दिसून आला. त्यामुळे माझ्यामते पुढील एक-दोन वर्षात जी साहित्य निर्मिती होईल त्यामध्ये कोरोनाचे विविध आयाम दिसून येतील. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती त्यामुळे बांधले गेलेले किंवा तुटलेले परस्परसंबंध याचा आढावा आगामी साहित्याचा विषय ठरेल असे मला वाटते. आता कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव देखील आटोक्यात आला आहे. तेंव्हा लसीकरणानंतर कोरोना पूर्णपणे आटोक्यात येईल आणि साहित्य विश्वाला आणि साहित्य चळवळीला नवे धुमारे फुटतील अशी आशा मी व्यक्त करतो, असे सांगून अनिल आजगावकर यांनी बेळगांव लाईव्हसह समस्त शहरवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

https://www.facebook.com/375504746140458/posts/1296168564074067/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.