मुरगोड पोलिसांच्या कारवाईत मोटार सायकल चोरी प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीच्या सहा चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी माहिती दिली आहे.
या कारवाईत राघवेंद्र लाडाप्पा कातर्की, बसवराज फकीराप्पा सालमंटपी (दोघेही राहणार चिचखंडी बुद्रुक, ता. मुधोळ, जि. बागलकोट) या दोघांना अटक करण्यात आली आहे. रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक शंकरगौडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगोडचे पोलीस निरीक्षक प्रवीण गंगोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी हि कारवाई केली आहे.
२ ऑगस्ट २०२० रोजी सौन्दत्ती तालुक्यातील यरगट्टी येथील केए २४ के ६८७२ क्रमांकाची हिरो स्प्लेंडर प्लस मोटार सायकलची चोरी करण्यात आली होती.
या प्रकरणी मुरगोड पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली होती. शुक्रवारी राघवेंद्र व बसवराज या दोघांना नंबर प्लेट नसलेल्या मोटार सायकलवरून जाताना ताब्यात घेण्यात आले.
यानंतर चौकशीदरम्यान हि मोटारसायकल चोरीची असल्याचे उघडकीस आले. अधिक तपासादरम्यान या जोडगोळीने अशा सहा मोटारसायकलींची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.