Friday, September 20, 2024

/

डिसें.मध्ये वाजणार महापालिका निवडणुकीचे बिगूल?

 belgaum

बेळगांव महानगरपालिकेची निवडणूक केंव्हा होणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागून राहिलेले असताना येत्या डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महापालिकेमध्ये हालचालींनाही प्रारंभ झाला आहे.

बेळगांव महापालिकेची प्रलंबित निवडणूक येत्या डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीच्या आरंभी घेण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. बेळगांव महापालिकेवर प्रशासक नियुक्त झाल्यापासून वार्ड पुनर्रचना आणि आरक्षणासंदर्भात गोंधळ निर्माण झाला होता. यासंदर्भात कांही नगरसेवकांनी कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन याचिकाही दाखल केली होती. त्या याचिकेचा निकाल देखील लागला, परंतु निवडणुका कधी होणार? याबाबत निर्माण झालेली साशंकता मात्र दूर झाली नाही. यात भर म्हणून कोरोना प्रादुर्भावाचे संकट आणि लॉक डाऊनमुळे हि निवडणूक आणखी लांबली होती. मात्र आता सदर निवडणूक घेण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला असून महापालिकेने जवळपास 90 टक्‍क्‍यांहून अधिक पुर्वतयारी पूर्ण केली आहे.

महापालिकेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर बेळगांव महापालिकेची निवडणूक जुन्या आरक्षणानुसार म्हणजे मजगाव 1 नंबर वॉर्ड आणि अलारवाड 58 नंबर वॉर्ड या जुन्या प्रभाग रचनेनुसार होण्याची दाट शक्यता आहे. तथापि आरक्षणाबाबत सरकार दसऱ्यानंतर निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ही निवडणूक लवकरात लवकर घेण्यात यावी असे निर्देश मिळाले असल्याची माहिती कांही अधिकाऱ्यांनी नांव न घालण्याच्या अटीवर दिली.

एकंदर बेळगांव महापालिकेच्या निवडणुकीला आता मुहूर्त लागणार असून येत्या डिसेंबर महिन्यात ही निवडणूक होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तथापि तसे झाल्यास इच्छुक उमेदवारांना प्रचारासाठी जादा वेळ मिळणार नाही. परिणामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार आतापासूनच तयारीला लागल्याचे पहावयास मिळत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.