सामाजिक बांधिलकी जपणारी अग्रगण्य संघटना म्हणून नावारूपास आलेल्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असतात. याअंतर्गत सोमवारी खानापूरनजीकच्या जंगलातील आदिवासी लोकांना मोफत अन्नधान्य, कपडे स्वयंपाकाची भांडी तसेच त्यांच्या मुलांना पादत्राणे देण्याचा उपक्रम सोमवारी राबविण्यात आला.
फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी खानापूरनजीकच्या जंगलातील आदिवासी पाड्यात राहणाऱ्या लोकांना तांदूळ, जोंधळा, कपडेलत्ते आणि त्यांच्या लहान मुलांना पादत्राणांचे वाटप करण्यात आले. याखेरीज रात्रीच्या वेळी जंगलात ये – जा करणे सोयीचे व्हावे यासाठी आदिवासिंना चार्जेबल बॅटऱ्याही देण्यात आल्या. याप्रसंगी कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे, धनंजय पटेल जोशी आदी उपस्थित होते.
संतोष दरेकर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी फेसबुक फ्रेंड सर्कलच्या सदस्यांनी खानापूर जंगलातील आदिवासी लोकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी आदिवासींना अन्नधान्याबरोबरच कपडेलत्ते, स्वयंपाकाची भांडी आणि बॅटर्यांची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे आदिवासी मुले पादत्राणे नसल्यामुळे जंगलात अनवाणी फिरत आणि खेळत असल्याचे फेसबूक फ्रेंड सर्कलच्या सदस्यांच्या निदर्शनास आले. याची दखल घेऊन तात्काळ सोमवारी सकाळी उपरोक्त सर्व वस्तूंचे आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन वितरण करण्यात आले.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी कॅम्प येथील प्रसिद्ध डॉक्टर समीर शेख आणि त्यांचे वडील जंगू शेख यांनी तांदूळ, दरेकर यांचे मित्र संजय अंगडी यांनी जोंधळे, अजित कुलकर्णी यांनी आदिवासी मुलांसाठी सुमारे 50 जोड सॅंडल्स आणि अमित कुलकर्णी यांच्या आई उज्ज्वला कुलकर्णी यांनी चार्जेबल बॅटऱ्या देणगी दाखल दिल्या असल्याचे संतोष दरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
समाजातील गोरगरिबांच्या मदतीसाठी फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे सोशल मीडियावर वेळोवेळी आवाहन केले जात असते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन उपरोक्त देणगीदारांनी आपल्या उपक्रमाला मदत केल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले. जंगलात राहणाऱ्या आदिवासी लोकांना दररोज अनंत समस्यांचा सामना करावा लागतो. सुसंस्कृत समाजापासून दूर असलेल्या या लोकांच्या मदतीसाठी शहरातील नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कपडेलत्ते, अन्नधान्य, आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी वह्या-पुस्तके, पेन पेन्सिल, ब्लॅकबोर्ड आदिंच्या स्वरूपात ही मदत करता येऊ शकते. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे आदिवासी लोकांना दूरवर जाऊन पिण्याचे पाणी आणावे लागते. त्यांचा हा त्रास वाचवण्यासाठी पाण्याची टाकी भेट देता येऊ शकते. याची नोंद घेऊन दानशूर व्यक्ती व नागरिकांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहनही संतोष दरेकर यांनी केले आहे.