Friday, April 19, 2024

/

जिल्ह्यातील जलाशयात इतकी आहे पाणी पातळी

 belgaum

गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हिडकल जलाशयासह अन्य जलाशयांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी बहुतांश जलाशयांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे.

गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आज गुरुवारी सकाळी 8 वाजता मार्कंडेय डॅममधील अंतर्गत पाण्याचा प्रवाह 9500 क्यूसेक्स इतका होता. त्याचप्रमाणे या जलाशयामधून नदीतील पाण्याचा विसर्ग 9450 क्यूसेक्स इतका होता. डॅमच्या उजव्या बाजूच्या कालव्यात 50 क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले होते. मार्कंडेय डॅमची क्षमता 3.669 टीएमसी इतकी आहे. सध्या या डॅममध्ये 3.403 टीएमसी पाणी साठा आहे, म्हणजे सदर डॅम 92 टक्के भरलेला आहे.

राजापूर धरणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला असून या धरणातून कृष्णा नदी, दूधगंगा नदी आणि कल्लोळी बॅरेजमध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे. हिडकल जलाशयामध्ये अंतर्गत पाण्याचा प्रवाह 43,402 क्यूसेक्स इतका असून जलाशयातील पाण्याचा विसर्ग अद्याप सुरू झालेला नाही.

सध्या या जलाशयात 30.75 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. थोडक्यात 51 टीएमसी क्षमतेच्या या जलाशयामध्ये सध्या 66 टक्के पाणी आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील 227.09 दलघमी पाणी साठ्याची क्षमता असणाऱ्या राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचनातून आज सकाळी 7 वाजता 1,400 तर अलमट्टी धरणातून 31,922 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

महाराष्ट्रातील धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग आणि पावसाचा वाढलेला जोर लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी एनडीआरएफ पथक सज्ज करण्यात आले आहे. पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वती तयारी केली असल्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले.

कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांची आम्ही सतत संपर्कात असून दोन्ही राज्ये मिळून पुरावर नियंत्रण मिळवू शकतो यासाठी आम्ही चर्चा करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा आणि घटप्रभा नद्यांना बऱ्यापैकी पाणी आले असले तरी भीती बाळगण्याचे कारण नाही. पावसाचा जोर कमी झाला तर निश्चितच पूर येणार नाही, असेही जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी स्पष्ट केले आहे.

मलप्रभा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.नविलतीर्थ धरणाची क्षमता 2079 फूट असून पूर्ण भरण्यास केवळ तेरा फूट कमी आहे.त्यामुळे पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढल्यास धरणाचे दरवाजे उघडले जाणार आहेत.यासाठी धरणाच्या खालील भागातील गावकऱ्यांनी आणि नदीकाठच्या रहिवाशांनी अन्यत्र स्थलांतर करावे.या संबंधी आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे असे अधीक्षक अभियंत्यांनी कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.