बेळगावमधील स्मार्ट सिटीच्या कामकाजात आजपर्यंत कुठेही स्मार्टपणा दिसून आला नाही. अनेक ठिकाणी केवळ स्मार्ट सिटीचे फलक झळकले. परंतु आजपर्यंत एकही ठिकाणी स्मार्ट कामे दिसून आली नाहीत.
उद्योगक्षेत्रात कर्नाटकातील दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या उद्यमबागच्या रस्त्याचीदेखील अशीच अवस्था झाली आहे. वर्षानुवर्षे येथील रस्त्यांची अवस्था दयनीयच असून मागील वर्षीच्या आणि यंदाच्या मुसळधार पावसामुळेतर या रस्त्याची अक्षरशः चाळण उडाली आहे.
रस्त्यांची दयनीय अवस्था आणि संततधार पाऊस यामुळे या भागात अनेक असुविधा डोके वर काढत आहेत. मागील वर्षी भूमिगत केबल आणि गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामामुळे आधीच या रस्त्यांची विल्हेवाट लागली आहे. या परिसरातील रस्ता दुरुस्ती कामकाज हाती घ्यावे यासाठी येथील स्थानिकांनी आणि उद्योजकांनी अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. परंतु आजपर्यंत कोणत्याही अधिकारी वा प्रतिनिधीनी याकडे लक्ष पुरविलेले नाही.
बेळगावमध्ये सर्वाधिक कर भरणाऱ्या वसाहतीमध्ये उद्यमबाग अग्रणी आहे. परंतु या भागात सुधारणा करण्यासाठी दुजाभाव केल्याचे मत उद्यमबाग येथील उद्योजक अनिरुद्ध मेहता यांनी व्यक्त केले आहे. आधीच कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेमुळे उद्योगक्षेत्र अडचणीत आहे त्यात अधिक भर म्हणून या भागात झालेली असुविधा यामुळे नागरिक, उद्योजक, येथे येणारे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. या रस्त्यांमुळे येथे अनेक अपघात होत आहेत आणि वाहनांचीही दुरवस्था होत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. अनेकवेळा लोकप्रतिनिधींशी संपर्क साधण्यात आला आहे परंतु तरीही येथे दुर्लक्ष करून येथील नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, गटारी आणि इतर मूलभूत सुविधांची येथे कमतरता असून औद्योगिक क्षेत्रासाठी बेळगावला कर्नाटकात दुसऱ्या स्थानी पहिले जाते. परंतु येथील असुविधा पाहता येथील प्रत्येकाला अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. सर्वत्र चिखल, खड्डे, आणि निसरट झाल्यामुळे अपघात होण्याच्या घटनांतूनही वाढ झाली आहे. येथे १०००० औद्योगिक युनिट कार्यरत असून सुमारे ३५००० कर्मचारी येथे काम करतात. परंतु रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे प्रत्येकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे असे मत उद्योजक अभिमन्यू डागा यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी विशेषतः रस्ते व गटारे यासाठी राखीव निधी राखून ठेवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे विकासकामांना उशीर होत आहे. पावसाची गती कमी होताच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले आहे.