Saturday, April 20, 2024

/

बेळगांवसाठी “जीवनरेखा” बुगी उपलब्ध करा : युवा समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

 belgaum

शहरासह जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची झपाट्याने वाढणारी संख्या लक्षात घेऊन त्यांच्यावरील उपचारासाठी बेळगावला “जीवनरेखा रेल्वे हॉस्पिटल” उपलब्ध करून दिले जावे, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

म. ए. युवा समितीतर्फे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली सदर मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. बेळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे सरकारी हॉस्पिटल व दवाखान्यांवरील ताण वाढत चालला आहे. मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे हॉस्पिटल आणि कोरोना उपचार केंद्रातील बेड्स कमी पडत आहेत. सध्या फक्त कोरोनावरील उपचारावरच लक्ष केंद्रित केले जात असल्यामुळे संक्रामक रोगांवरील उपचारांकडे दुर्लक्ष होत आहे. खाजगी हॉस्पिटलमधील उपचाराचे अव्वाच्या सव्वा दर परवडणारे नसल्यामुळे सर्वसामान्य गरीब लोकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोना प्रादुर्भावाचा प्रारंभ झाला तेंव्हा रेल्वे खात्याने एक स्तुत्य घोषणा करताना रेल्वेच्या जुन्या बोगींचे अर्थात रेल्वे डब्यांचे कोरोना हॉस्पिटलमध्ये परिवर्तन करण्यात येईल असे जाहीर केले. सध्या हुबळी येथे या जीवनरेखा रेल्वे बोगींचे काम पूर्ण झाले आहे. सदर योजना अद्याप अंमलात आणण्यात आली नसली तरी सरकारी आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेऊन बेळगावसाठी जीवन रेखा रेल्वे हॉस्पिटल उपलब्ध करून दिले जावे. त्याचप्रमाणे खातेनिहाय फ्लू- क्लिनिक सुरू करून त्याद्वारे जास्तीत जास्त चांचण्या घेतल्या जाव्यात. कोरोनाप्रमाणेच डेंग्यू, मलेरिया, टाईफाइड सारख्या संक्रामक रोगांवरील उपचाराकडे देखील गांभीर्याने लक्ष दिले जावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

दरम्यान, आपल्या मागण्यांसंदर्भात माहिती देताना युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले की, सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. इस्पितळात उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे, अशा परिस्थितीत सरकारने जीवनरेखा हॉस्पिटल सारखी सुविधा बेळगावला उपलब्ध करून दिली पाहिजे. आमच्या माहितीनुसार या रेल्वे हॉस्पिटल साठीच्या 320 बोगी हुबळी रेल्वे डेपोमध्ये तयार आहेत. तेथे चौकशी केली असता जर बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जीवनरेखा रेल्वे हॉस्पिटलची लेखी गरज व्यक्त केल्यास त्यानुसार त्या बोगी बेळगावला पाठविल्या जातील, असे सांगण्यात आले.

Yuva mes
Yuva mes

योगायोगाने रेल्वे खात्याचे मंत्री बेळगावचे असताना नागरिकांना उपचाराअभावी त्रास सहन करावा लागत आहे ही अत्यंत लाजिरवाणी व खेदाची गोष्ट आहे असे सांगून रेल्वेमंत्र्यांनी फक्त उद्घाटने आणि फिता न कापता रेल्वे हॉस्पिटलची सोय जनतेला उपलब्ध करून द्यावी, असे परखड मत शुभम शेळके यांनी व्यक्त केले.

उच्चपदस्थ डॉक्टर रुग्णांवर उपचार करण्यात पुढाकार घेत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला.

अलीकडे डॉक्टरांच्या हाताखालील वैद्यकीय कर्मचारीच जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत, किमान त्यांना तरी संबंधित डॉक्टरांनी सहकार्य करावे. सध्या सर्दी, ताप, खोकला येणे हा जणू गुन्हा झाला आहे. या किरकोळ आजारांवर उपचार करण्यासाठी सरकारने एक वेगळी यंत्रणा तयार करावी, असे शेळके यांनी सांगितले. निवेदन सादर करतेवेळी संतोष कृष्णाचे, धनंजय पाटील, श्रीकांत कदम आदींसह म. ए. युवा समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.