Saturday, December 7, 2024

/

श्री विसर्जन मिरवणुकीवर बंदी नको : “यांनी” केली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

 belgaum

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या गणेशोत्सवावर बंदी न घालता दरवर्षीप्रमाणे मंगलमुर्तीच्या स्वागत आणि विसर्जन मिरवणुकीस परवानगी दिली जावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजू महादेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी सकाळी सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. दरवर्षी देशभरात श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्री गणेशोत्सव हा राष्ट्रीय सण असून सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते प्रतिवर्षी मंगलमूर्तीची आगमना दिवशी आणि विसर्जना दिवशी मोठ्या भक्तिभावाने मिरवणूक काढत असतात. तेंव्हा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा या मिरवणुकीवर बंदी न घालता ती काढण्यास परवानगी दिली जावी. याशिवाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचा सरकारकडून मोफत जनरल ग्रुप इन्शुरन्स काढण्यात यावा.

खत आणि बियाणे पुरवठा करणाऱ्या कांही कंपन्यांकडून निकृष्ट दर्जाचे बनावट खत व बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. परिणामी विविध कारणास्तव आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तेंव्हा सरकारने संबंधित कंपन्यांवर आणि बियाण विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करावी. कोरोना हे नैसर्गिक संकट असल्यामुळे गरिबी रेषेखालील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जावे. त्याचप्रमाणे बेळगाव शहर व जिल्ह्यासह राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांवर योग्य पद्धतीने उपचार करून त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात, अशा मागण्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.

निवेदन सादर करतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील यांच्यासह ज्योतिबा पाटील, दुर्गेश मेत्री आदींसह बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.