Wednesday, April 24, 2024

/

श्री गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यास परवानगी : जिल्हाधिकारी

 belgaum

सध्या कोरोना प्रादुर्भावाची तीव्रता वाढली असली तरी सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यंदाचा सार्वजनिक श्री गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यास परवानगी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.

येत्या गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी संदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे शहरातील दोन्ही गणेशोत्सव महामंडळांची संयुक्त बैठक बोलावली होती. याप्रसंगी त्यांनी उपरोक्त माहिती दिली. बैठकीस जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्त त्यागराज मनपा आयुक्त जगदीश के. एच., अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुरदुंडी, अशोक तेली आदींसह अन्य पोलीस व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

आयसीएमआरची मार्गदर्शक सूची लवकरच येणार आहे आहे. त्यावेळी पुन्हा एकदा गणेशोत्सव महामंडळांची बैठक घेऊन नेमक्या कशा पद्धतीने यंदाचा गणेशोत्सव साजरा करायचा हे ठरविण्यात येईल. याशिवाय कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महामंडळांनी यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याची जी भुमिका घेतली आहे, त्याची माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

 belgaum
Ganesh meeting
Ganesh meeting

राज्यासह बेळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासाठी सरकारने गांभीर्याने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तथापि गणेशोत्सव हा राष्ट्रीय सण असल्याने तो साजरा करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे, असे पोलिस आयुक्त त्यागराज यांनी स्पष्ट केले. सोशल डिस्टंसिंग अर्थात सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करून लहान-मोठ्या सर्व गणेशोत्सव मंडळांनी गोंधळ व गर्दी होणार नाही याची खबरदारी घेत मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा. तसे झाल्यास जिल्हा प्रशासन त्यांना नक्की सहकार्य करेल, असेही त्यांनी नमूद केले.

आम्ही मार्गदर्शक सूचनांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्यास तयार आहोत. मात्र गणेशोत्सवावर संपूर्ण बंदी घातली जाऊ नये. कारण उत्सवासाठी श्री मूर्ती तयार झालेल्या आहेत. शिवाय पोलीस खात्यानेही गणेशोत्सव संदर्भात महिन्याभरापूर्वी बैठक घेतली आहे असे गणेश उत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत बोलताना नमूद केले.

धार्मिक उत्सवांच्या योजनांवर संपूर्ण बंदी घातली जाणार नाही. मात्र मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यात देखील या मार्गदर्शक सूचीचे आचरण केले जात आहे. आपणही त्या सूचीचे पालन करून गणेशोत्सव साजरा करूया, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शेवटी सांगितले. याप्रसंगी विकास कलघटगी, शिवराज पाटील, रणजीत चव्हाण -पाटील, रमाकांत कोंडुसकर, विजय जाधव, सुनील जाधव, गिरीश धोंगडी, हेमंत हावळ आदींसह शहरातील दोन्ही गणेश उत्सव महामंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.