Thursday, April 25, 2024

/

आणि पालकमंत्र्यांनी काढली स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी!

 belgaum

जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आज सोमवारी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाच्या निकृष्ट दर्जाबद्दल सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरून त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तसेच शहरातील समस्या जाणून घेण्यासाठी लवकरच माजी नगरसेवकांची बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले.

बेळगाव स्मार्ट सिटी योजने अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांबाबतच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आज सोमवारी स्मार्ट सिटी लिमिटेडच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वनविभाग, पाणी पुरवठा खाते, हेस्कॉम सार्वजनिक बांधकाम खाते आदी सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांना कामातील हयगय आणि निकृष्ट विकास कामांबद्दल धारेवर धरले. स्मार्ट सिटीच्या सर्व विकास कामांबद्दल नाराजी व्यक्त करून लवकरच आपण स्मार्ट सिटी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकांना बेळगावला घेऊन येणार आहोत. यापुढील बैठक त्यांच्यासोबत आयोजित केली जाईल. त्यावेळी स्पॉट इन्स्पेक्शन देखील केले जाईल. तेंव्हा तत्पूर्वी सर्व कामे व्यवस्थित पूर्ण करा अशी सक्त सूचना जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना दिली दिली.

पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख जलवाहिनीसह शहरातील विविध ठिकाणी जलवाहिन्यांना लागलेली गळती वेळेवर दुरुस्त केली जात नाही, जलवाहिन्या बदलल्या जात नाहीत याबद्दल मंत्र्यांनी पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. बेळगाव शहरातील जलवाहिन्यांच्या देखभालीसाठी सरकार दरवर्षी 48 कोटी रुपयांचा मेंटेनन्स खर्च देत असते. या पैशाचे तुम्ही काय करता? असा संतप्त सवाल मंत्री जारकीहोळी यांनी केला.

 belgaum
Ramesh jarkiholi review meeting
Ramesh jarkiholi review meeting

हेस्कॉमच्या कामाबद्दलही पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलताना आमदार अनिल बेनके यांनी हेस्कॉमकडून पथदीपांसाठी नवीन खांब घालायचे म्हणून जुने खांब काढले जातात परंतु त्या ठिकाणी नवे खांब बसविले जात नसल्याचा आरोप केला. पथदीप नसल्यामुळे संबंधित भागात रात्री अंधाराचे साम्राज्य असते. याबाबत जनतेने आम्हाला जाब विचारला तर आम्ही काय उत्तर द्यायचे? असा सवाल आमदार बेनके यांनी केला. यावेळी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आमदार बेनके यांच्या तक्रारीचे समर्थन केले. ते म्हणाले की, मी स्वतः आमदारांसोबत दोन ठिकाणी भेट देऊन आलो आहे. त्याठिकाणी वीज पुरवठा अभावी नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तेंव्हा हा नवे खांब बसवणे तसेच वीज पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व कामे वेळच्या वेळी पूर्ण झाली पाहिजेत, असे मंत्र्यांनी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना बजावले. जे कंत्राटदार आपले काम वेळेत पूर्ण करणार नाहीत त्यांना नोटिसा द्या, अशी सूचनाही त्यांनी केली.

शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेत बाबत तर पालकमंत्र्यांनी तीव्र नापसंती व्यक्त करून संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली तुमच्या घरासमोर खड्डा खोदून वर्षभर तो तसाच ठेवला तर चालेल का? असा सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना केला. तेव्हा शहरातील रस्त्यांच्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्ते लवकरात लवकर व्यवस्थित तयार करण्याचा आदेश पालकमंत्र्यांनी दिला. स्मार्ट सिटीच्या कामाबद्दल अनेक तक्रारी असल्यामुळे मी सर्व माजी नगरसेवकांची शहरातील समस्या जाणून घेण्यासाठी बैठक घेणार आहे, असे जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी यावेळी सांगितले. याला स्थानिक आमदारांनी विरोध दर्शविला. तथापि पालकमंत्र्यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहात स्थानिक नगरसेवकांची बैठक घेतल्यामुळे नेमक्या समस्या समजतील असे सांगून आपणही बैठक लवकरच घेणार असल्याचे स्पष्ट केले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.