बेळगाव जिल्ह्यातील मुख्य आणि आर्थिक उलाढालीची बाजारपेठ म्हणून एपीएमसीकडे पाहिले जाते. मात्र येथील अंतर्गत रस्त्यांची वाताहत झाल्याचे दिसून आले आहे. नुकतीच पडलेल्या मुसळधार पावसामुळे येथील रस्त्यावरील खडी आणि खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे येथून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सुमारे 5 कोटीहुन अधिक निधी रस्त्यांसाठी मंजूर करण्यात आल्याचे माहिती आहे.
मात्र हा निधी गेला कुठे असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. जर 5 कोटी मंजूर झाले असतील तर तातडीने अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करून रस्ते चकाचक करावेत. मात्र याकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. एपीएमसी येथील सोयीसुविधांसाठी तब्बल 17 कोटी मंजूर झाले आहेत. मात्र 17 कोटींमध्ये काहींनी आपली मक्तेदारी ठेवण्याचेही सांगण्यात येत आहे. या परिसरातील रस्ते पाहता प्रवास करणे कठीण बनले आहे. मोठ्या प्रमाणात बाहेरून येणाऱ्या व्यापारी वर्गाला या रस्त्यांचा फटका बसत आहे.
त्यामुळे कधी एकदा रस्ते पूर्ण करणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. येथे पाण्याची समस्या गटारी समस्या आणि इतर बर्याच समस्या उद्भवत आहेत. मात्र याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पडलेल्या पावसात मोठ्या प्रमाणात रस्ते उघडून गेले आहेत तर काही रस्ते चालण्याच्याही परिस्थितीत नसल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे एपीएमसी प्रशासनाला कधी जाग येणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. कोट्यावधी रूपये खर्च करून देखील जर रस्ते व सुविधा मिळत नसतील तर आम्ही कर कशासाठी भरावा, असा सवाल ही व्यापार यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे येथील रस्ते तातडीने दुरुस्त करावे अशी मागणी होत आहे.