Wednesday, April 24, 2024

/

कोगनोळी नाक्यावर कार्यरत अधिकाऱ्यांचे गृहमंत्र्यांनी केलं कौतुक

 belgaum

महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित प्रवासी कर्नाटकात येत आहेत. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ई -पास असणाऱ्या महाराष्ट्रातील प्रवाशांना कांही दिवस कोगनोळी टोल नाक्यावरून कर्नाटकात प्रवेश दिला जाऊ नये, असा सक्त आदेश शनिवारी राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला आहे.

गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी सकाळी निपाणी तालुक्यातील कोगनोळी येथील कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवरील अत्यंत महत्त्वाच्या कोगनोळी टोल नाक्याला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. याप्रसंगी गृहमंत्र्यांनी उपरोक्त आदेश दिला आहे. कर्नाटक राज्यात आढळून येणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे महाराष्ट्रातून आलेले आहेत. काल शुक्रवारीच राज्यात नव्याने सापडलेल्या 248 रुग्णांपैकी तब्बल 207 कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्र रिटर्न असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर तुर्तास महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्याकडे ई -पास असला तरी कर्नाटकात प्रवेश दिला जाऊ नये, असे गृहमंत्री बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे.

Bommai visits kognoli toll
Bommai visits kognoli toll

कोगनोळी टोल नाका हा आंतरराज्य तपासणी नाका आहे. या नाक्यावरून हजारो लोक दररोज ये – जा करत असतात. तेंव्हा सरकारच्या मार्गदर्शक सूचीची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच कोरन्टाईनचा निर्धारित अवधी पूर्ण झाल्यानंतरच प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी जाऊ दिले जावे असे सांगून सेवा सिंधू ॲपच्या माध्यमातून ई -पास मिळालेल्यांची काटेकोर तपासणी केली जात असल्याबद्दल गृहमंत्र्यांनी कोगनोळी चेक पोस्ट येथील आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली. बेळगाव जिल्हा प्रशासनासह पोलीस खाते आणि आरोग्य खाते हे संयुक्तरीत्या कोगनोळी टोल नाका येथे उत्तम प्रकारे कार्य करत आहे, असे प्रशंसोद्गारही त्यांनी काढले.

 belgaum

कोगनोळी टोल नाका येथे नियुक्त असलेल्या सर्वांनीच कोणाच्याही दबावाखाली न येता आपले काम करावे, असे सांगून या ठिकाणच्या कांही आरोग्य कर्मचाऱ्यांसह पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात आले आहे. तेंव्हा येथील सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतःची व्यवस्थित काळजी घेऊन काम करावे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी सक्तीने पीपीई किटचा वापर करावा, असे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले.

बसवराज बोम्म्मई यांनी कोगनोळी चेक पोस्टची पहाणी –

या टोल नाक्यावरून दररोज किती वाहने ये-जा करतात याची माहिती घेऊन यापुढे गुडस वाहन चालक आणि क्लीनर यांचीही आरोग्य तपासणी करण्याचा आदेश गृहमंत्र्यांनी दिला. तसेच टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी 8 – 8 तासाच्या शिफ्टमध्ये काम करावे, अशी सूचनाही केली. यावेळी त्यांनी आरोग्य खात्यासह पोलीस खात्याच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. राज्यातील संसर्गजन्य तबलिगींचा शोध लावून त्यांच्यावर उपचार करण्याची मोहीम पोलीस खात्याने यशस्वीरित्या पार पडली असल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून नमूद केले. कोरोना प्रादुर्भाव रोखण्या मध्ये पोलीस खात्याने अत्यंत महत्वाची भूमिका निभावली असल्याचे सांगून भविष्यातही आपण सर्वजण मिळून उत्तम कार्य करूया, असे गृहमंत्री बोम्मई यांनी सांगितले.

गृहमंत्र्यांच्या शनिवारच्या पाहणी दौराप्रसंगी अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांनी कोगनोळी टोल नाक्यावरील कामकाजाची माहिती दिली. तसेच ई -पास बाबत ऑनलाईन माहिती मिळाल्यास येथील कर्मचाऱ्यांचा वेळ वाचू शकतो, असे गृहमंत्र्यांना सांगितले. गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी यावेळी कोगनोळी येथील सरकारी विश्रामधामालाही ही भेट देऊन पाहणी केली. गृहमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी त्यांच्यासमवेत विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, जिल्हाधिकारी डाॅ. एस. बी. बोमनहळ्ळी, आयजीपी राघवेंद्र सुहास, पोलीस आयुक्त लोकेश कुमार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.