महाराष्ट्रातून कर्नाटकात येण्यासाठी आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात जाण्यासाठी शिनोळी येथील संपर्क रस्ता महत्त्वाचा मानला जातो. मात्र हा रस्ता पुन्हा एकदा माती टाकून बंद करण्यात आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे हाल सुरू असून या परिसरातील शेतकऱ्यांनी कोणाकडे पहावे असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने परवानगी असल्याशिवाय कर्नाटकात प्रवेश दिला जाऊ नये असे आवाहन केले आहे. त्यामुळे अडचणीत भरच पडत आहे.
बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावरील शिनोळी येथे पुन्हा एकदा माती टाकून रस्ता बंद करण्यात आल्याने ये-जा करणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. मात्र कोरोनाच्या धास्तीमुळे पुन्हा रस्ता बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलून अनेकांना जायबंदी आणि प्रवेश बंदी घालण्यात धन्यता मानली आहे.
विशेष म्हणजे बेळगावात सापडलेल्या कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे हा रस्ता पुन्हा बंद करण्यात आला आहे. मात्र या परिसरात काही महाराष्ट्रातील शेतकरी कर्नाटकात शेती असल्यामुळे ये जा करत असतात तर काही कर्नाटकातील शेतकरी महाराष्ट्रात शेती असल्यामुळे ये-जा करत असतात. मात्र हा सारा प्रकार बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.महाराष्ट्र कोरोना बाबत आघाडीवर आहे त्यातच बेकायदेशीर रित्या महाराष्ट्रातून बेळगावला येणाऱ्यांच्या नियंत्रण ठेवण्यासाठी हा रस्ता बंद करण्यात आलाय.
त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होणार आहेत. शेती करावी की सोडावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. वारंवार या भागातील शेतकर्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पुन्हा एकदा सीमेवरील रस्ता बंद झाल्याने शेतकर्यांना आर्थिक फटका बरोबरच शेतीचे नुकसान सोसावे लागणार आहे. त्यामुळे हा रस्ता सुरू करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.