Friday, April 19, 2024

/

केएचबी कार्यालयाचा अंदाधुंद कारभार : अधिकाऱ्यांच्या उचलबांगडीची मागणी

 belgaum

महांतेशनगर येथील कर्नाटक हाऊसिंग बोर्डचे (केएचबी) कार्यालय म्हणजे तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची स्वतःची खाजगी मालमत्ता झाली आहे का? असा संतप्त सवाल केला जात आहे. याठिकाणी कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नसल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तेंव्हा या कार्यालयातील बेशिस्त कारभारास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना एक तर निलंबित करावे अथवा त्यांची अन्यत्र उचलबांगडी करावी, अशी मागणीही केली जात आहे.

महांतेशनगर येथील कर्नाटक हाऊसिंग बोर्ड कार्यालयाने सध्या बेशिस्तपणा आणि उर्मटपणाचा कळस गाठला आहे. सदर कार्यालयात अंदाधुंद बेशिस्त कारभार सुरू असून कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. या कार्यालयात एकही कागदपत्र अथवा फाईल व्यवस्थित जतन करून ठेवण्यात आलेली नाही. कर्नाटक हाऊसिंग बोर्डाच्या कार्यालयात लिलाव आदी जमिनी संदर्भातील तसेच गृहनिर्माण संदर्भातील कागदपत्रे, फाईली वगैरे दस्तावेजांचे रेकॉर्ड ठेवले जाते. नागरिक आणि सरकारच्या सोयीसाठी हे रेकॉर्ड ठेवले जात असते, जेणेकरून गरज पडेल तेंव्हा नागरिकांना आणि सरकारलाही त्या कागदपत्र अथवा फायलींची मदत घेता येऊ शकते. यासाठी कर्नाटक हाऊसिंग बोर्ड कार्यालयाला संबंधित कागदपत्रे आणि फायली व्यवस्थित जतन कराव्या लागतात.

महांतेशनगर येथील कर्नाटक हाऊसिंग बोर्डाच्या कार्यालयात मात्र परस्पर विरोधी चित्र पहावयास मिळते. याठिकाणी कोणत्याही फाईली अथवा कागदपत्रे व्यवस्थित जतन करून ठेवण्यात आलेली नाहीत. दोरीने गठ्ठे बांधून फायली आणि कागदपत्रे सदर कार्यालयावर असणाऱ्या दोन खोल्यांमध्ये हव्या तशा ठेवून देण्यात आली आहेत. सदर खोल्यांची वेळोवेळी साफसफाई केली जात नसल्यामुळे धूळखात पडून असलेल्या कागदपत्रांना देखभालीअभावी वाळवी लागली आहे. कांही ठिकाणी पावसाच्या पाण्याने फाईली व कागदपत्रे भिजून गेल्यामुळे त्यावरील अक्षरे धूसर झाली आहेत. कांही वर्षापूर्वीची एखादी फाईल अथवा कागदपत्र याठिकाणी कधीच वेळेवर मिळत नाही. यासंदर्भात विचारणा केल्यास कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अरेरावीचे वर्तन केले जाते. केएचबीचे कार्यालय म्हणजे स्वतःची खाजगी मालमत्ता असल्याचा तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अविर्भाव असतो. परिणामी या ठिकाणी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

 belgaum

कलाल नामक व्यक्तीला ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी 2003 मधील लिलावाची एक फाईल कर्नाटक हाऊसिंग बोर्ड कार्यालयातून हवी होती. आता गेल्या या तीन आठवड्यापासून त्यांना संबंधित फाइल उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. संबंधित फाईलीसाठी कलाल यांना केएचबी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. आज सोमवारी त्यांनी पुन्हा एकदा केएचबी कार्यालयात जाऊन फाईली संदर्भात विचारणा केली असता वरच्या खोलीत तुम्ही स्वतः जाऊन तुमची फाईल मिळते का पहा असे कलाल यांना सांगण्यात आले. या केएचबी ऑफिसमधील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा कळस म्हणजे त्यांनी कलाल यांना पुढच्या वेळी येताना सोबत दोघा-तिघांना घेऊन या आणि तुम्हाला हवी ती फाईल शोधून घ्या असे सांगितल्याचे कळते.

फक्त कलालच नाही तर कामानिमित्त या कार्यालयात जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हाच अनुभव येत आहे. एकंदर महांतेशनगर येथील कर्नाटक हाऊसिंग बोर्ड कार्यालयातील कामकाजाचा पुरता बोजवारा उडलेला असून तेथील अंदाधुंद कारभारामुळे नागरिकांना मात्र नाहक मनस्ताप होत आहे. तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित गांभीर्याने लक्ष देऊन केएचबी कार्यालयातील उद्धट वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांना एक तर निलंबित करावे अथवा त्यांची अन्यत्र बदली केली जावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.