Thursday, April 25, 2024

/

महाराष्ट्र सरकार काढणार सीमाभागात शिक्षण संस्था

 belgaum

बेळगावचे जिल्हाधिकारी जर त्या ठिकाणी 4 ते 5 एकर जागा देत असतील तर मराठी भाषिकांसाठी हैदराबादच्या धर्तीवर महाविद्यालय उभारण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस आहे. याबाबत आज फक्त चाचपणी केली असून अद्याप आपण कोणत्याही निर्णयापर्यंत आलो नसल्याचे महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज शनिवारी कोल्हापुर येथे बोलताना सांगितले.

उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेली ही माहिती लक्षात घेता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार बेळगाव अथवा एकंदर सीमाभागात एखाद्या ठिकाणी मराठी शिक्षण संस्था सुरू करण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाप्रश्न सोडवणुकिला प्राधान्य देत सीमा भागासाठी समन्वय मंत्र्यांची नियुक्ती केली. तसेच त्या अनुषंगाने नुकतीच सीमा समन्वय समितीची बैठकही घेतली.

सीमाप्रश्न प्रमाणेच महाराष्ट्र सरकारकडून सीमाभागातील मराठी शिक्षण संस्थांच्या उत्कर्षासाठी सहकार्य केले जाते. यासाठी दरवर्षी सीमाभागातील मराठी शिक्षण संस्थांना महाराष्ट्र सरकारकडून अनुदान दिले जाते. सीमाप्रश्न सुटण्याबरोबरच सीमाभागातील मराठी भाषा व संस्कृती टिकावी यासाठी महाराष्ट्रातील विद्यमान महाविकास आघाडीचे सरकार पूर्वीच्या सरकारांच्या तुलनेत अधिक संवेदनशील आहे.

 belgaum

या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सीमाभागात विशेष करून बेळगाव परिसरात मराठी भाषिकांसाठी हैदराबादच्या धर्तीवर महाविद्यालय सुरू करण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस असल्याचे बोलून दाखवले आहे. सदर महाविद्यालय स्थापण्यासाठी सध्या प्राथमिक स्वरुपात चाचपणी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सदर बाब बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी दिलासा देणारी असून या संदर्भातील पुढील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
______________

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.