Saturday, April 20, 2024

/

श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्री येथे श्रीपंत महाराजांचा ११४ वा पुण्यतिथी उत्सव

 belgaum

थोर संतश्रेष्ठ व अवधूत सांप्रदायाचे प्रणेते सद्गुरू श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांचा ११४ वा पुण्यतिथी उत्सव अश्विन वद्य २ ते ४ या तिथीला मंगळवार १५ ते गुरुवार १७ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत बेळगाव जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्री येथे साजरा होणार असून त्यानिमित्त उत्सव सोहळ्याचे व यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्रीचे अध्यक्ष प्रदीप पंतबाळेकुंद्री यांनी दिली आहे.

मंगळवार १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता बेळगाव शहरातील पंतवाड्यात प्रेमध्वजाचे विधीवत पूजन होऊन प्रेमध्वजाची बेळगाव ते पंतबाळेकुंद्री अशी मिरवणूक निघेल. ही मिरवणूक सायंकाळी बाळेकुंद्री गावातील पंतवाड्यात येईल. या प्रेमध्वजाचा रात्री ८ वाजता पंतमंदिरासमोर शिवाय नमः ॐ व दत्तगुरू जय दत्तगुरू या गजरात प्रेमध्वजारोहण सोहळा संपन्न होईल.

बुधवार १६ ऑक्टोबर रोजी श्रीपंत महाराज आत्मस्वरूपात विलिन झाले तो क्षण भक्तांकडून सामूहिक नामस्मरण रूपाने साजरा करून व मेणबत्यांच्या प्रकाशात आरती करून “श्रींचे पुण्यस्मरण” हा कार्यक्रम पहाटे ५ ते ६ यावेळेत होईल. सकाळी ८ वाजता बाळेकुंद्री गावातील पंतवाड्यातून श्रींची उत्सवमूर्ती पालखीत ठेवून श्रीपंत महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुरूवात होईल. हा पालखी सोहळा संपूर्ण बाळेकुंद्री गावात फिरून दुपारी २ वाजता आमराईमध्ये आल्यानंतर मुख्य पंतमंदिरात श्रींच्या उत्सवमूर्तीची स्थापना करून ” जन्मोजन्मी ऐसा सद्गुरू मिळावा ” हे पद म्हटले जाईल. रात्री ८ ते १२ यावेळेत पंतमंदिरासमोर पालखी सोहळा संपन्न होईल या वेळी श्रींची पालखी ही मुख्य पंतमंदिराला ३ प्रदक्षिणा व ६ टप्पे पूर्ण करेल.

Pant maharaj

गुरुवार १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता मुक्तव्दार महाप्रसाद होईल. दुपारी ३ ते ५ यावेळेत श्रीपंत महाराजांच्या श्रीदत्त प्रेमलहरी या भजनगाथेतील पदांवर आधारित प्रेमानंद टिपरी सोहळा संपन्न होईल. रात्री ८ वाजता परतीचा पालखी सोहळा आमराईतील पूज्यस्थानानांवर जाऊन पालखी बाळेकुंद्री गावातील पंतवाड्यात जाऊन आरती अवधूता संपन्न होऊन पुण्यतिथी उत्सव समाप्त होईल.

यंदा महाराष्ट्र आणि कर्नाटकातून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी १४ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजल्यापासून ते १७ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजेपर्यंत “सौ. यमुनाक्का मुक्त अन्नछत्र” च्या माध्यमातून भक्तांसाठी २४ तास चहा, नाश्ता व जेवण मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्री येथे भव्य असे ” यमुनाक्का अन्नछत्र ” उभारण्यात येत असून त्याचे बांधकाम प्रगतीपथावर सुरु आहे. भक्तांचा आरोग्याची काळजी घेण्यासाठी शंकरपंत आरोग्य सेवा मंडळाचा नव्याने बांधण्यात आलेला दवाखाना सज्ज आहे.

या पुण्यतिथी उत्सवानिमित्त १५ व १६ ऑक्टोबर असे दोन दिवस श्रीपंत बोधपीठातर्फे श्रीपंत वाङ्मयाच्या अभ्यासावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या बोधपीठामध्ये ” श्रीदत्त प्रेमलहरी त्रैमासिक ऑक्टोबर २०१९ व श्रीपंतावधूत दिनदर्शिका २०२० चे प्रकाशन करण्यात येणार आहे. श्रीपंत महाराजांच्या वाङ्मयाचा प्रचार व प्रसार सर्वदूर व्हावा यासाठी श्रीनरसिंहपंत वाङ्मय प्रचार व प्रसार मंडळातर्फे श्रीपंत वाङ्मयाचा भव्य असा स्टाॅल उभारण्यात येणार असून पंतभक्तांना समग्र वाङ्मयासह नवीन वर्षाची पंतावधूत दिनदर्शिका उपलब्ध होणार असल्याची माहिती श्रीनरसिंहपंत वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष अप्पासाहेब दड्डीकर यांनी दिली आहे. तरी जास्तीत जास्त पंतभक्त व गुरूबंधू भगिनींनी या उत्सवाला उपस्थित राहून श्रीपंत प्रेमाचा आनंद लुटावा, असे श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्री बेळगाव यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.