आराम बसने मालवाहू ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेत बस मधील पाच प्रवाशी ठार तर 17 जण जखमी झाले आहेत.गुरुवारी पहाटे पाचच्या दरम्यान सातारा हायवेवर डी मार्ट जवळ हा अपघात घडला आहे.
विश्वनाथ विरूपक्षी वय 57 रा. गड्डी संकेश्वर हुक्केरी, अब्बास अली काटगी वय 43 रा. अनगोळ बेळगाव, डॉ सचिन गौडा पाटील (वय ३२ रा. संकेश्वर) आणि गुंडू तुकाराम गावडे अशी मयतांची नावे आहेत.आणखी एकाची ओळख पटवणे बाकी आहे तर एक जण गंभीर जखमी असून त्याची परिस्थिती चिंताजनक आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो.
मुंबईकडून एसआरएस कंपनीची खासगी आराम बस बेळगाव कडे प्रवासी घेऊन निघाली होती. साताराजवळ आल्यावर डि मार्टसमोर खासगी बसची समोरून निघालेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. अपघात एवढा जोरदार होता की बसच्या उजव्या बाजूकडील सीटवर बसलेले पाच प्रवासी जागीच ठार झाले. तर बसमधी सतरा प्रवासी जखमी झाले.
जोरदार धडकेमुळे खासगी आराम बसच्या पुढच्या भागाचा पुरता चक्काचूर झाला होता. अपघाताची माहिती मिळताच सातारा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक हंकारे यांच्यासह पोलीस फोजफाटा घटनास्थळी पोहचला होता. जखमींना सातारा येथील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.