Thursday, March 28, 2024

/

रहदारीचे क्रमप्राप्त नियोजन करा

 belgaum

शहरातील वाढती लोकसंख्या व त्यापेक्षा जास्त पटीने वाढत चालेली वाहनांची संख्या पाहता आपल्या शहरातील मध्यवर्ती रस्त्यांची रुंदी ही जास्तीत जास्त सुमारे १० ते १५ वर्षे हा वाहनांचा ताण झेपू शकेल असे दिसते आहे. यादृष्टीने वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याची मागणी होत आहे.

बेळगावमध्ये जसजशी वाहतूक वाढत जाईल तसतसा वेळेचा खोळंबा आणि उशीर तर होईलच; पण त्याबरोबर माणसांच्या स्वभावातपण फरक पडेल .पोहचायला होणारा उशीर यामुळे माणसे वैतागायला लागतील. मग रोजच्या कटकटीमुळे रक्तदाब, हृदयविकार असे विकार होऊ लागतील. शिवाय, घरी आणि कामाच्या ठिकाणी चिडचिड वाढत जाईल. वाहनांची गर्दी झाली, रांगा लागल्या की चालती वाहने एका जागी उभी राहतात. त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅस असे इंधन वाया जाईल तसेच हवेच्या प्रदूषणात वाढ होणार. उद्योगधंद्यांचा कामाचा व महत्त्वाचा वेळ आणि पैसा फुकट जाणार. प्रदूषणामुळे तब्येतीवर झालेल्या दुष्परिणामांमुळे, अपघातांमुळे रुग्णालयात भरती व्हावे लागेल त्यामुळे कुटुंबाचे व समाजाचे पैसे, श्रम, वेळ उपचारांवर खर्च वाढणार. हा सर्व प्रकार सध्या आपल्याला पुणे-मुंबईत बघायला मिळतो. आपले शहर या वाहतूक समस्येतून मुक्त ठेवायचे असेल तर आपण सर्व बेळगावकरांनी एकजुटीने प्रयत्न करायला हवा.

मोदी सरकारने स्मार्ट सिटी नावाची संकल्पना आणली आहे. पण ती कशी राबवायची व त्याचे बरेवाईट परिणाम हे सरकारच्या किंवा मोदींच्या हातात नाहीत, ते आपण सर्व बेळगावकरांच्या हातात आहे. स्मार्ट सिटीमधील सर्वांत महत्त्वाचा विषय वाहतूकव्यवस्था हाच आहे.

 belgaum

या विषयाचा अभ्यास मनपा व त्यांचे अधिकारी करतीलच पण आपण आपल्या शहराचे सुज्ञ नागरिक म्हणून आपल्या बाजूने जेवढी काही वाहतूकव्यवस्थेमध्ये सुधारणा होईल असे प्रस्ताव व प्रबोधन करणे गरजेचे आहे. कुठलीही शासनाची योजना आली की विरोधी पक्षाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असतो व त्याला खो कसा घालता येईल यासाठी प्रयत्न केला जातो. विरोधाला विरोध म्हणून येऊ घातलेल्या योजना फोल ठरविल्या जातात.

वाहतूक व्यवस्था ही कुठल्याही शहराची रक्तवाहिनी सारखी असते. या रक्तवाहिनीला ब्लॉकेज आले की हृदयविकाराचा झटका येतोच; तसा आपल्या बेळगाव शहराला झटका येऊ नये असे जर आपल्याला वाटत असेल तर चांगली वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे क्रमप्राप्त आहे.

लोकल ट्रेन, ट्राम, भुयारी मेट्रो, बीआरटीएस, सिटी बस, फिडर लाईन्सला रिक्षा, सारख्या योजनांपैकी कोणतीही सुसज्ज सर्व थरांतील लोकांसाठीची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपल्या शहरासाठी असणे गरजेची आहे. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था उत्तम असल्यास रस्त्यावरच्या रहदारीचा ताण कमी होतो, शहरात जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी वेळात पाहिजे, त्या ठिकाणी वाजवी दरात पोहचता यावे, हाच मुख्य उद्देश ठेऊन नियोजन केले पाहिजे.

कुठल्याही सार्वजनिक वाहतुकीचे जाळे शहरभर पसरविण्यासाठी त्यासाठी लागणारा खर्च याचा विचार होणे गरजेचे आहे. आपल्या सगळ्यांना वाटतं आपल्या शहरात भुयारी मेट्रो किंवा ट्रेन असावी. परंतु, आपण सगळे जाणतो की सध्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाला साधी बस चालवणे पण परवडत नाही.

एखादी योजना राज्य शासन आपल्या खांद्यावरुन महानगरपालिकेच्या खांद्यावर सोपवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत असते. परंतु या रहदारीच्या नुकसानीला कारणीभूत कुठल्या गोष्टी आहेत, याचा विचार आपल्या सारख्या सामान्य लोकांना कसा कळणार ?

आपल्या सारख्या करदात्यांचा पैसा वाया न जाता त्याचा योग्य ठिकाणी उपयोग होऊ शकतो. असे काहीसे उपाय स्मार्ट सिटीच्या प्रस्तावात विचाराधीन झाल्यास बेळगाव खरोखर स्मार्ट सिटी होऊ शकेल.

न्यूज सोर्स:@सुनील जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.